हिंगोली जिल्ह्यात ५ जण गेले पुरात वाहून; दोघे सापडले, तिघांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 07:41 PM2021-09-25T19:41:21+5:302021-09-25T19:43:03+5:30
rain in hingoli : धबधबा पाहण्यासाठी हिंगोलीतील काही मित्र शनिवारी दुपारच्या सुमारास गेले होते.
हिंगोली : पारोळा शिवारातील तलावाच्या सांडव्यावरून हिंगोली शहरातील तिघे मित्र वाहून गेल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी घडली. यातील दोघांचा शोध घेण्यात यश आले असून ते सुखरूप आहेत. तर वाहून गेलेल्या एकाचा शोध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घेत आहे.
जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. शनिवारीही सकाळपासूनच सर्वदूर पाऊस कोसळत होता. यामुळे नदी, ओढ्यांना पूर आला होता. शेतातील पिकेही पाण्याखाली गेली असून मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नदी, ओढ्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात ५ जण वाहून गेले. हिंगोली तालुक्यातील पारोळा परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे येथील तलावही भरला. सांडव्यावरून खाली पडणाऱ्या पाण्याला धबधब्याचे स्वरूप आले आहे.
हा धबधबा पाहण्यासाठी हिंगोलीतील काही मित्र शनिवारी दुपारच्या सुमारास गेले होते. यावेळी यातील कुणाल बंडू खंदारे (वय २० रा. गणेशवाडी, हिंगोली) याचा पाय घसरून तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात होता. त्याला वाचविण्यासाठी शिवम कैलास खंदारे (वय १९) व सचिन मधूकर शिंदे (वय २०) यांनी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिघेही वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीणचे पोलीस निरक्षक मळघणे, बीट जमादार संतोष वाठोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पथकाने वाहून गेलेल्या तरूणांचा शोध सुरू केला. यावेळी यातील शिवम कैलास खंदारे व सचिन मधूकर शिंदे हे दोघे काही अंतरावर सापडले. दोघेही सुखरूप असून कुणाल खंदारे याचा पोलीस शोध घेत आहेत.
मन्नास पिंपरी, साखरा तांडा येथील दोघांचा शोध सुरू
सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी व साखरा तांडा परिसरातही शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला होता. यात मन्नास पिंपरी जवळील आलेल्या ओढ्याच्या पुरात संतोष कोंडूजी गायकवाड (रा. हिवरा गायकवाड) हे वाहून गेले. ते मन्नास पिंपरी येथे आले होते. गावाकडे परत जात असताना ही घटना घडली. तर साखरा तांडा शिवारातील ओढ्याला आलेल्या पुरात ४५ वर्षीय मुकबधीर व भोळसर महिला सावित्रीबाई थावरा चव्हाण (रा. साखरा तांडा) असे वाहून गेलेल्या महिलेचे नाव आहे. दोघांचाही शोध सुरू आहे.