चिमुकलीच्या उपचारासाठी पालकांनी तुडवला ५ किलोमीटरचा चिखलमय रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 07:12 PM2018-08-20T19:12:58+5:302018-08-20T19:14:00+5:30
अडीच वर्षाच्या चिमुकलीच्या उपचारासाठी तिच्या आई-वडिलांना तब्बल ५ किलोमीटरचा चिखलमय रस्त्यातून पायपीट करावी लागली.
हिंगोली : अडीच वर्षाच्या चिमुकलीच्या उपचारासाठी तिच्या आई-वडिलांना तब्बल ५ किलोमीटरचा चिखलमय रस्त्यातून पायपीट करावी लागली. मात्र, एवढे करूनही तिची प्रकृती नाजूक आहे. चिमुकलीवर हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
ही घटना आहे, कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावची. करवाडी येथील रामचंद्र व सुनीता क-हाळे हे मजूर कुटुंब राहते. त्यांना अडीच वर्षाची मुलगी आहे. आज सकाळी तेजस्वीनी या त्यांच्या मुलीची अचानक तब्यत बिघडली. त्यामुळे भयभीत झालेले क-हाळे पती-पत्नीची तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याची धावपळ सुरु झाली. परंतु; करवाडीला जोडणारा रस्ताच नसल्यामुळे त्यांना कच्च्या रस्त्यातून चिखल तुडवत पुढे जावे लागले. पडत्या पावसात त्यांनी चिमुकलीला हातावर घेत ५ किमीची प्रवास करत बोल्डा आरोग्य केंद्र गाठले. चिमुकलीची प्रकृति गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला हिंगोलीला हलविण्यास सांगितले. हिंगोली जिल्हा रूग्णालयात तेजस्वीनीवर डॉ. नागेश बांगर यांनी उपचार केले. मात्र प्रकृती नाजूक असल्याने तिला डॉक्टरांनी तेजस्वीनीला नांदेडला पुढील उपचारासाठी पाठविले आहे.
मातेस अश्रू अनावर
दोन दिवसांपूर्वीच भारतीय आदिवासी पॅंथर तर्फे करवाडी येथील रस्त्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. खराब रस्त्यामुळे मुलीला वेळेवर उपचार मिळाले नसल्याचे सांगतांना सुनीताबार्इंना अश्रू आवरता आले नाही.