पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ; चावा घेतल्याने ५ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:00 PM2023-09-23T12:00:14+5:302023-09-23T12:02:09+5:30
वसमत तालुक्यातील प्रकार,वनविभाग गावात दाखल
- इस्माईल जाहगीरदार
वसमत (जि.हिंगोली): थोरावा येथे शनिवारच्या पहाटे पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घातला. घराबाहेर झोपलेल्या ५ जणांसह १२ वर्षीय मुलीस घरात जाऊन वानराने चावा घेतला. यात ५ जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. यानंतर पिसाळलेले वानर पकडण्यासाठी वनविभागाचे पहाटे पथक गावात दाखल झाले आहे.
वसमत तालुक्यातील थोरावा येथे २३ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजेदरम्यान पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घातला. यात वानराने घरात झोपलेल्या भक्ती गुंडाळे (वय १२) मुलीस चावा घेत जखमी केले. तसेच घराबाहेर झोपलेले शेषेराव देवरे (वय ७०), त्यांचा मुलगा नागोराव देवरे (वय ४०) या दोघांना चावा घेतला. नंतर देवीदास पारडकर (वय ४५), गंगाधर पारडकर (वय ४०) यांना चावा घेत जखमी केले. ५ जण वानराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
शिवसांब नरवाडे (वय ३८) यांच्यावर वसमत शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरीकांनी वनविभागाला पिसाळलेल्या वानराची माहिती देताच वनपाल बालाजी पवार यांच्यासह पथक गावात दाखल झाले आहे. वनविभागाचे पथक त्या पिसाळलेल्या वानराचा शोध घेत आहेत. वानराने पहाटे धुमाकूळ घालताच पूर्ण गाव जागे झाले होते. गावातील मंदिरातून दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. पिसाळलेल्या वानराच्या दहशतीने नागरीकांत भिती निर्माण झाली आहे.
पिसाळलेल्या वानराचा बंदोबस्त करा...
वनविभागाचे पथक गावात दाखल असताना देखील पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घातला त्या वानराचा त्वरीत बंदोबस्त करावा,काही ही करा पण् त्या वानरास आवर घाला असे बोलत नागरीकांनी संताप व्यक्त केला.
वन विभाग करतेय काय?
वन्यप्राणी शेतात आले तर ते आपण समजू शकतो. पण वन्यप्राणी गावात येत आहेत हे कोणते लक्षण आहे. कुठे गेले ते पथक?, कुठे गेले ते कर्मचारी?, कुठे गेली ती सुरक्षा? असे अनेक प्रश्न उभे राहतात. या आधी मुक्या जनावरांना या वन्य प्राण्यांनी मारले. आता हे वन्यप्राणी गावात येत आहेत. आतातरी वन विभागाने जागे होणे गरजेचे आहे.