राज्यभरातील नगरपालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:31 AM2021-07-30T04:31:57+5:302021-07-30T04:31:57+5:30
हिंगोली : राज्यभरातील नगरपालिका, नगरपंचायतीमधील एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ देण्याचा ...
हिंगोली : राज्यभरातील नगरपालिका, नगरपंचायतीमधील एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे विश्वनाथ घुगे यांनी दिली.
नगरपालिका, नगरपंचायतीमधील कर्मचारी कोरोना काळात जिवाची पर्वा न करता काम करीत आहेत. यात जवळपास ५५ जे ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने ५० लाख रुपयांचा विमा मिळावा म्हणून संघटनेतर्फे शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, शासनस्तरावर याबाबत कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे संघटनेच्या वतीने ॲड. अमित देशपांडे यांनी शासनाविरुद्ध औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश रवींद्र घुगे यांनी शासनाच्या मुख्य सचिवामार्फत मंत्रिमंडळासमोर विम्याचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून शासनाने २८ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीमधील अधिकारी, सफाई कामगार, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयास ५० लाख रुपयांच्या विम्याचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी दिली.