आरटीईत अजूनही ५0 टक्के जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:40 AM2018-07-04T00:40:55+5:302018-07-04T00:41:36+5:30
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या योजनेत जिल्ह्यात ५९ शाळांतील ६९७ जागा आहेत. मात्र त्यापैकी ४९९ जागांवर विद्यार्थी निवड झाली असून प्रत्यक्षात २८0 प्रवेश झाले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर एक महिना लोटल्यावरही ही परिस्थिती असल्याने शिक्षण विभाग काय वरातीमागून घोडे नाचविणार आहे काय? असा सवाल केला जात आहे.
मागील काही वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत प्रवेशाची रक्कम न मिळाल्याने संस्थाचालकांत नाराजी होती. त्यामुळे शासनाने मागील वर्षीची रक्कम सोडून सर्व रक्कम अदा केली होती. त्यामुळे संस्थाचालक यंदा पुन्हा प्रवेश द्यायला राजी झाल्या. मात्र अजून त्यात फारशी प्रगती दिसत नाही. यावर्षी १२९९ पालकांनी आपल्या मुलाला आरटीईत प्रवेश मिळावा म्हणून आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी ४९९ विद्यार्थ्यांची विविध शाळांमध्ये निवड झाली होती. मात्र आरटीईच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ २८0 जणांनाच संबंधित शाळांनी प्रवेश दिला आहे. काही विद्यार्थी प्रवेशास गेलेच नसल्याचे सांगितले जाते. तर काही ठिकाणी संस्थाचालकांनी त्यांना दिलेल्या १७ प्रकारच्या अधिकारांचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. यावर शिक्षण विभागाही काही बोलत नाही. एकीकडे शाळा सुरू होवून तब्बल महिन्याचा कालावधी उलटला असताना दुसरीकडे आरटीईत शंभर टक्के जागांवर विद्यार्थी निवडही पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता नव्याने प्रवेश मिळाल्यास या विद्यार्थ्याचा तेवढा अभ्यास बुडाल्यास त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. शिक्षण विभागाच्या सूत्रांनुसार शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. कदाचित आधीच प्रवेश घेतला असल्यास त्यांच्या शुल्काचे काय?