दोन बहिणींच्या लग्नात आले ५०० वऱ्हाडी; पंगतीला पोलीस पाहताच सारेच ‘सावधान’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 06:27 PM2020-07-10T18:27:34+5:302020-07-10T18:31:32+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दोन बहिणींचे एकाच मंडपात थाटात लग्न पार पडले.
हिंगोली : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असताना औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे गुरुवारी सकाळी दोन बहिणींच्या लग्नाला तब्बल ५०० वऱ्हाडींनी हजेरी लावली. शुभमंगल पार पडल्यानंतर जेवणाची तयारी सुरू असतानाच महसूल अधिकाऱ्यांचा ताफा आणि पोलिसांना पाहून ५०० वऱ्हाडी ‘सावधान’ झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे म्हणाले, बोरजा येथील लग्न सोहळ्यात नियमापेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात चौकशी करण्यात येत आहे. या कार्यक्रमास जबाबदार असणारे, सामाजिक अंतर न पाळणारे, मास्क न वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. बासंबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू म्हणाले, ‘चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. महसूलचे पथक घटनास्थळी गेले होते. पथकाच्या तक्रारीनंतर दोन्ही वऱ्हाडींवर गुन्हे दाखल करण्यात येतील.’
...अन् तब्बल ५00 जणांची पळापळ सुरू
औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दोन बहिणींचे एकाच मंडपात थाटात लग्न पार पडले. या लग्नासाठी दोन्ही मुलांकडील तब्बल ५00 वऱ्हाडी जमले. ही माहिती कोणीतरी जिल्हा प्रशासनाला कळविली. लग्न झाल्यानंतर जेवणाची तयारी सुरू असतानाच महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी धडकले. त्यामुळे वऱ्हाडींची पळापळ सुरू झाली. सामाजिक अंतर, मास्क वापरण्याच्या सक्तीची ऐशीतैशी दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.