पोत्रा, सिंदगी साठवण तलावासाठी ५२ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:30 AM2021-01-20T04:30:33+5:302021-01-20T04:30:33+5:30
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पोतरा व सिंदगी साठवण तलावाच्या कामासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या तलावामुळे ...
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पोतरा व सिंदगी साठवण तलावाच्या कामासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या तलावामुळे परिसरातील ८५० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आ. संतोष बांगर यांनी दिली.
कळमनुरी तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून पोतरा व सिंदगी परिसर ओळखला जातो. या भागात सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. मार्च महिन्यातच विहिरीचे पाणी तळ गाठते. यामुळे बागायती पिके घेता येणे शक्य नाही. त्यामुळे पोतरा व सिंदगी भागात साठवण तलाव मंजूर करुन त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी आ. बांगर यांच्याकडे केली होती.
शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन आ. बांगर यांनी पोतरा व सिंदगी येथे सिंचन तलाव मंजूर करावा व निधी उपलब्ध करुन द्यावा, यासााठी मृद व जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर शासनाने या तलावांना मंजुरी दिली असून, यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सिंदगी तलावामध्ये २.०५, तर पोतरा तलावात २.०२ दलघमी पाणीसाठा होणार आहे. या साठ्यामुळे परिसरातील ८५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सिंदगीसाठी २४.५०, तर पोेतरा तलावासाठी २५.३८ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आ. संतोष बांगर यांनी दिली आहे.