किसान सन्मान योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून वसुलीपात्र ५.३० कोटी, वसूल १४ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 06:16 PM2020-11-05T18:16:26+5:302020-11-05T18:18:28+5:30
किसान सन्मान योजनेत बनावट लाभार्थ्यांचा शिरकाव
हिंगोली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शासनाकडून जिल्ह्यातील २ लाख ९ हजार ४२८ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दर चार महिन्यांनी २ हजार रुपये जमा केले जातात. त्यात ७ हजार ४३० शेतकरी लाभार्थी बनावट असल्याची बाब निष्पन्न झाली असून संबंधितांकडून ५ कोटी ३० लाख २६ हजार रुपये वसूल करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यापैकी केवळ १४ हजार रुपये वसूल झाले आहेत.
शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंमलात आणली. याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ९ हजार ४२८ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दर चार महिन्यांनी २ हजार रुपये याप्रमाणे वर्षाकाठी ६ हजार रुपयांचा निधी जमा करण्यात येत आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. दरम्यान, स्वत:ची खोटी माहिती सादर करून तथा काही मयत झालेल्या शेतकऱ्यांची नावे पुढे करून तसेच करदाते असतानाही ७ हजार ४३० शेतकऱ्यांनी आतापर्यंत ५ कोटी ३० लाख २६ हजारांचा मोठा निधी हडपल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थींंकडून विनाविलंब रक्कम वसूल करण्याचे आदेश शासन स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याची दखल घेत प्रशासन कामाला लागले; मात्र २ नोव्हेंबरपर्यंत केवळ वसमत आणि कळमनुरी येथील २ शेतकऱ्यांकडून १४ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली. उर्वरित ७ हजार ४२८ शेतकऱ्यांनी चुकीने हडपलेली रक्कम वसूल करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे
2,09,428 शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी जमा होते रक्कम
7,430 बनावट लाभार्थ्यांना परत करावे लागणार ५ कोटी ३० लाख
02 शेतकऱ्यांनी आतापर्यंत परत केले १४ हजार रूपये
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत हिंगोली जिल्ह्यातील एकूण २ लाख ९ हजार ४२८ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर चार महिन्यांनी २ हजार रूपये याप्रमाणे रक्कम जमा केली जात आहे. त्यातीलच ७ हजार ४३० लाभार्थी बनावट असल्याचे चौकशीत आढळले आहे. संबंधितांकडून रक्कम वसुलीची कार्यवाही गतीने सुरू करण्यात आली आहे.
- चंद्रकांत सूर्यवंशी, आरडीसी