ओळखपत्र न मिळाल्याने ५४ विद्यार्थी नवोदय परीक्षेपासून वंचित;पालकांतून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 02:05 PM2020-01-11T14:05:17+5:302020-01-11T14:09:10+5:30
या विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांचे परीक्षा फार्म सबमीट न झाल्याने त्यांचे आॅनलाईन ओळखपत्र आलेच नाहीत.
कळमनुरी (जि. हिंगोली) : जिल्ह्यातील विविध केंद्रावरून ११ जानेवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीची परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु कळमनुरी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांचे ऑलनाईन ओळखपत्रच आले नाही. त्यामुळे या ५४ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास नकार दिल्याने विद्यार्थी आणि पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभार आता परत एकदा चव्हाट्यावर आला आहे. कळमनुरी येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील ५४ विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. या विद्यालयातील ५४ विद्यार्थ्यांचे परीक्षा फार्म सबमीट न झाल्याने त्यांचे आॅनलाईन ओळखपत्र आलेच नाहीत. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकाने ओळखपत्र तयार केले, त्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जेव्हा हे ओळखपत्र सकाळी १० ते १०.३० वाजता घेऊन आले व बैठक क्रमांक शोधत होते. परंतु आॅनलाई फॉर्मच सबमीट न झाल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकाच आली नसल्याचे समोर आले. यावेळी एकच गोंधळ उडाला होता, विद्यार्थी आणि पालकांतून संताप व्यक्त केला जात होता.
गट शिक्षणाधिकारी म्हणतात...
याबाबत कळमनुरीचे तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी राजेश पातळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, ही शाळेची चूक आहे. या विद्यार्थ्यांचे फार्म सबमीट न झाल्याने त्यांचे आॅनलाईन ओळखपत्र आले नाहीत. यात दोषीं मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल.