५७ टक्के महिला ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:48+5:302021-01-08T05:38:48+5:30

कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १६ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. ९३ ग्रामपंचायतींमध्ये ७७४ ...

57% women in Gram Panchayat election arena | ५७ टक्के महिला ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात

५७ टक्के महिला ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात

Next

कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १६ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत. ९३ ग्रामपंचायतींमध्ये ७७४ महिला आपले नशीब अजमावीत आहेत. ही टक्केवारी ५७ टक्के आहे. ७६१ सदस्यांच्या जागांसाठी १३६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात होणार आहे.

१०९ ग्रामपंचायतीमध्ये ७३ हजार ४२१ पुरुष व ६६ हजार ७८८ महिला मतदार आहेत. ९३ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी अथवा तिरंगी लढती पाहावयाला मिळणार आहेत. निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून आता उमेदवार प्रत्यक्ष प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींसाठी ५८६ पुरुष तर ७७४ महिला निवडणूक रिंगणात आहेत. १६ ग्रामपंचायतींमधील ११४ सदस्य बिनविरोध निवडून आले असून यातही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महिलांची संख्या आहे.

ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेबाबत पहिले प्रशिक्षण देण्यात आले. दुसरे प्रशिक्षण १० जानेवारी रोजी होणार आहे. ९३ ग्रामपंचायतींत अटीतटीच्या लढती पाहायला मिळत असून राजकीय डाव आखण्यात येत आहेत. ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यकर्ते सांभाळताना गाव पुढाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. दुसरीकडे मात्र पैशांची उधळपट्टी सुरू आहे. काही उमेदवार मतदारांना आश्‍वासनांची खैरात देत असून काही उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानासाठी हात जोडून मतदान मागत आहेत.

प्रामाणिक व विकासाभिमुख उमेदवारालाच मतदार पसंती देण्याची शक्यता आहे, असे दिसते. तालुक्‍यातील १६ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. यात ११४ सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. यातही ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिलांच आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ५७ टक्के महिला निवडणूक रिंगणात आहेत, तर ४३ टक्के पुरुष ग्रामपंचायतीत आपले भाग्य अजमावत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्या तरी मात्र ५७ टक्के महिला निवडणूक रिंगणात आहेत.

आता किती टक्के महिला निवडून येतील हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे. प्रशासनाने निवडणुकीची पूर्ण तयारी केली असून कर्मचाऱ्यांना दुसरे प्रशिक्षण १० जानेवारी रोजी देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रशिक्षणाबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार, प्रवीण ऋषी आदी मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: 57% women in Gram Panchayat election arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.