सेंद्रिय शेतीतील उसाच्या रसविक्रीतून मिळवला सहा लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 07:49 PM2019-02-13T19:49:13+5:302019-02-13T19:54:57+5:30
यशकथा : या प्रयोगातून त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
- दिलीप कावरखे ( हिंगोली )
सेंद्रिय शेती प्रयोगाद्वारे दीड एकरात जवळपास १६० मेट्रिक टन उसाचे उत्पन्न घेत रसविक्रीतून वर्षाला सहा ते साडेसहा लाखांचा निव्वळ नफा शेतकरी नामदेव कावरखे यांनी कमावला आहे. या प्रयोगातून त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी नामदेव कावरखे यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ऊस शेती व रसविक्रीचा व्यवसाय गत तीन वर्षांपासून सुरूकेला. गोरेगाव येथील चौफुली मुख्य रस्त्यावरील कावरखे यांच्या सेंद्रिय ऊस रसवंतीला प्रवासी वाटसरू, ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे.
एका उसाचे वजन ४ ते ५ किलो असून एका उसापासून ते ८ ते १० ग्लास रस काढून प्रतिग्लास १० रुपये दराने विक्री करतात. सेंद्रिय ऊस लागवड व इतर व्यावसायिक खर्च वगळून वर्षाकाठी सहा ते साडेसहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वयाची सत्तरी ओलांडलेले अल्पभूधारक शेतकरी नामदेव महादजी कावरखे यांनी विषमुक्त सकस आहाराच्या सेवनाने शरीराची सुदृढता कायम राखीत सेंद्रिय शेतीच्या हलाखीच्या परिस्थितीवर मातदेखील केली आहे. कावरखे यांच्याकडे एकूण सहा जनावरे आहेत. त्यात एक बैल जोडी, दोन गायी, वासरे या गुरांच्या शेणापासून तयार केलेले शेणखत तसेच विकत आणलेल्या गांडूळ खताच्या वापरातून गत तीन वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबवीत आहे.
उन्हाळ्यात ते स्वत: लिंबाच्या लिंबोळ्या गोळा करून निमअर्क तयार करून ठेवतात. लिंबोळी अर्काचा वापर पावसाळा व हिवाळ्यात पिकांवर फवारणीसाठी करतात. सेंद्रिय पद्धतीने दीड एकर शेतात ऊस लागवडीतून १६० मेट्रिक टन ऊस उत्पादन घेतले आहे. कावरखे यांनी मुले दीपक आणि अनथा यांना रसवंतीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे. शेतातील ऊस उन्हाळी हंगामात रसवंतीवर आणून रस काढून त्याची ते विक्री करतात.
कावरखे यांच्याकडे एकूण ३ एकर शेती आहे. गुरांपासून मिळणारे शेण चांगल्या प्रकारे कुजवून व त्यात गांडूळ खत मिसळून ते शेतीसाठी वापरतात. यंदा त्यांनी उसात अंतरपीक म्हणून मुगाची पेरणी केली होती. त्यातून एकरी दोन क्विंटल मुगाचे उत्पन्न मिळविले आहे, तर एक एकरामध्ये गव्हाची पेरणी केली आहे.
सेंद्रिय खताच्या वापरातून गतवर्षी एका एकरात २२ क्विंटल गहू झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अर्ध्या एकरमध्ये ६ पोते सोयाबीन आणि ४ पोते तुरीचे उत्पन्न घेतले आहे. ते सेंद्रिय शेतीत पिकवलेल्या गव्हाचा तसेच तूर डाळीचा घरी खाण्यासाठी वापर करतात. विषविरहित सेंद्रिय अन्नसेवनाने त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य सुदृढ असल्याचे ते म्हणाले. सेंद्रिय अन्नधान्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या ९० वर्षीय आईचे आरोग्य ठणठणीत असून अद्याप त्यांचा एकही दात पडला नाही. त्यांच्या शेतात १० लिंबोनीची झाडे असून सेंद्रिय खताच्या मात्रेमुळे बाराही महिने झाडांना लिंबू लगडलेले असतात.