हिंगोलीत चोरट्यांच्या धुमाकूळ; वारंगा फाटा येथे एकच रात्री फोडली ६ दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:41 PM2020-12-10T13:41:19+5:302020-12-10T13:42:05+5:30
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बाळापूर महामार्गावर लागून असलेले किराणा दुकान, शीतपेय एजन्सी, दूध संकलन केंद्र, आडत दुकान व एक कृषी केंद्र अशी एकूण ६ दुकानात चोरी
वारंगा फाटा ( हिंगोली ) : राष्ट्रीय महामार्गावरील वारंगा फाटा येथे एकाच रात्री ६ दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना गुरूवारी घडली आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बाळापूर महामार्गावर लागून असलेले किराणा दुकान, शीतपेय एजन्सी, दूध संकलन केंद्र, आडत दुकान व एक कृषी केंद्र अशी एकूण ६ दुकाने १० डिसेंबर रोजी पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास फोडून रोख रक्कम लंपास केली आहे. येथील आचल किराणा, वैष्णवी एजन्सी, दूध संकलन केंद्र, गोविंद ट्रेडिंग आणि हायटेक ॲग्रो अशा सलग असणाऱ्या दुकानांची शटर अज्ञात चोरट्यांनी गजाळीच्या सहाय्याने वाकून दुकानात प्रवेश केला. वैष्णवी एजन्सी दुकानातून ९० हजार रुपये रोख रक्कम चोरल्याची माहिती दुकानदार विठ्ठल अग्रवाल यांनी दिली. तर अन्य दोन दुकानांत ठेवलीली रक्कम लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.
या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, रवि हूंडेकर, पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते, जमादार शेख बाबर व पोलीस कर्मचारी हजर झाले. या धाडसी चोरीमुळेहिंगोलीचे श्वानपथक व ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटे कैद झाले आहेत. यामध्ये एकूण किती जण होते,त्या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांनी जवळपास ४५ मिनिटांपेक्षाही अधिक वेळ चोरी केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजेपर्यंत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.