वसमतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री ६ दुकाने फोडली; औषधी, किरणासह रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 01:45 PM2023-07-12T13:45:02+5:302023-07-12T14:02:12+5:30
शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
- इस्माईल जाहागिरदार
वसमत: शहरातील नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स व एसबीआय बँक परीसरातील ६ दुकानांचे चोरट्यांनी शटर वाकवून चोरी केली. दुकानातील किराणा, औषधासह नगदी ९५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
शहरात आज पहाटे नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स व एसबीआय बँक परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. येथील किराणा दुकान, कृषी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, औषधी दुकान, जनरल स्टोअर्स या दुकानांची शटर वाकवून चोरटे आत शिरले. किराणा सामान, औषधीसह सेतू सुविधा केंद्रामधील ९५ हजार रुपये चोरट्यांनी पळवले. दरम्यान, दुकानांचे शटर वाकवून दुकानात प्रवेश करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरट्यांची ओळख पटविण्यासाठी शहर पोलिस प्रयत्न करत आहेत.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार शेख हकीम, जोंधळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस ठाण्यात सुरू होती. गेल्या वर्षी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. शहर पोलिस ठाण्याचे पोनि कदम यांनी गुन्हेगारीवर पकड निर्माण करताच शहरातील चोऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. दरम्यान, एकाच रात्री ६ दुकाने फोडल्याने शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.