आरटीई प्रवेशासाठी ६६४ आॅनलाईन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:27 AM2018-02-23T00:27:22+5:302018-02-23T00:27:29+5:30
शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण ६६४ जणांचे अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले आहेत. ६९२ आरक्षित जागेत आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण ६६४ जणांचे अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले आहेत. ६९२ आरक्षित जागेत आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्केअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यात २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील पाल्यांना प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेस १० फेबु्रवारीपासून सुरूवात झाली. पालकांना पाल्याचे आॅनलाईन अर्जासाठी २८ फेबु्रवारी शेवटची तारीख आहे. जिल्ह्यातील ५९ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानकडून देण्यात आली. जास्तीत-जास्त पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. १० फेबु्रवारीपासून आनलाईन अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला असून २२ फेबु्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आॅनलाईनद्वारे ६६४ अर्ज प्राप्त झाले होते. सदर आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरूच होती. पालकांनी पाल्यांचे अर्ज करताना संबंधित वेबसाईटवर अचूक माहिती सादर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
गतवर्षी आरटीई २५ टक्क्यांतून हिंगोली जिल्ह्यासाठी ५१२ जागा आरक्षित होत्या. चालू शैक्षणिक वर्षात यंदा जिल्ह्यासाठी जागा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ६९२ आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पालकांनी अर्ज करावेत. तसेच आॅनलाईन प्रणालीद्वारे माहिती भरताना अचूकपणे भरावी. काही तांत्रिक अडचणी असल्यास पालकांनी शिक्षण विभागाशी संपर्क करावा. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सदर आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात येणार आहे.