जिल्हा परिषद शाळांमधील ६६९ वर्गखोल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:53+5:302021-06-17T04:20:53+5:30
हिंगोली जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणच्या जि.प. बहुविध शाळेचे बेहाल असून ग्रामीण भागातही अनेक शाळांमध्ये अनेक शाळा पडायला आल्या आहेत. मात्र ...
हिंगोली जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणच्या जि.प. बहुविध शाळेचे बेहाल असून ग्रामीण भागातही अनेक शाळांमध्ये अनेक शाळा पडायला आल्या आहेत. मात्र पूर्वीसारखा सर्व शिक्षा अभियानात वर्गखोल्यांना निधी मिळत नसून इतर योजनातही शासनाकडून निधी मिळत नाही. त्यामुळे या धोकादायक वर्गखोल्यातच शाळा भरत आहेत. हा कारभार कधी थांबणार? यावर काहीच उत्तर नाही.
३४ कोटींचे प्रस्ताव पडून
हिंगोली जिल्ह्यात प्राथमिक शाळांत औंढा ८३, वसमत ८८, हिंगोली १०९, कळमनुरी ४३, सेनगाव ५८ वर्गखोल्यांची आवश्यकता असून यासाठी जवळपास २९.३३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
माध्यमिक शाळांमध्ये हिंगोली १५, कळमनुरी ५, सेनगाव ३३ अशी एकूण ५३ वर्गखोल्यांची गरज आहे. यात ४.०८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
या दोन्ही बाबींचे प्रस्ताव पाठविण्यात आले असले तरीही कोरोनामुळे नंतर या प्रस्तावाचा विचारच झाला नाही. तर डीपीसीतून शाळांसाठी मिळणारा निधीही अपुरा आहे.
अशा शाळेत मुले पाठवायची कशी?
शाळेच्या दोन वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून येथे नवीन वर्गखोल्या होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र वर्गखोली धोकादायक बनली असून कायम मुलांची चिंता लागून राहिलेली असते. याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
-प्रताप सोळंके, हिंगोली
आमच्या गावातील शाळेत जुन्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. तर नवीन वर्गखोल्यांची ही गरज आहे. मात्र नवीन वर्गखोल्या मिळत नाही. अन् आहे ते धोकादायक पाडत नाहीत. मुलांचा जीव धोक्यात घालणारी ही बाब आहे.
-अजित बांगर, आजेगाव
जिल्ह्यातील एकूण शाळा ८८२
एकूण विद्यार्थी २.३ लाख
वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक ३२७
तालुकानिहाय धोकादायक वर्गखोल्या
हिंगोली १२३
वसमत १३६
कळमनुरी १०३
औंढा ना. ८९
सेनगाव २१८