७ हजार २४० शिक्षकांची होणार कोरोना टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:30 AM2021-01-20T04:30:19+5:302021-01-20T04:30:19+5:30
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरु होणार आहेत. ...
हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरु होणार आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार असून पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण कमी संख्येने आढळून येत आहेत. संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील १ हजार १३ शाळांमधून ८३ हजार ६५१ विद्यार्थी प्रवेशित असून ७ हजार २४० शिक्षक कार्यरत आहेत. यामध्ये जिल्हा परिषद , खासगी शाळांचा समावेश आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी वर्गाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून, पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळातील ७ हजार २४० शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट २० जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. जसजसे शिक्षकाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह येईल तसतसे शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
कोरोना टेस्ट संदर्भात शिक्षकांची घेतली जातेय माहिती
पाचवी ते आठवी वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांची माहिती संकलित केली जात असून, कोरोना टेस्ट करण्यासंदर्भात शिक्षकांना माहिती दिली जात आहे. शाळा प्रशासनाला वर्ग निर्जंतुकीकरणासंदर्भात शिक्षण विभागाकडून सूचना दिल्या जात आहेत.
आरटीपीसीआर टेस्ट नंतरच नियुक्ती
ज्या शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली असेल अशा शिक्षकांना शाळेत क्रमाक्रमाने घेतले जाणार आहे. शाळा निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पालकांच्या संमतीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.
-संदीप सोनटक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी,