पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी महापोळा; ७०० वर्षांची परंपरा पाळत वाईत ४० हजार बैलजोड्यांची हजेरी
By विजय पाटील | Published: August 27, 2022 12:03 PM2022-08-27T12:03:29+5:302022-08-27T12:04:07+5:30
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी वाईत भरतो महापोळा, रात्रीपासूनच येत होत्या बैलजोड्या
हिंगोली : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या करीच्या दिवशी भरणाऱ्या महापोळ्याला मराठवाड्यासह विदर्भातूनही मोठ्या प्रमाणात बैलजोड्या आल्याने यंदा विक्रमी गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. कोरोनामुळे दोन वर्षे साध्या पद्धतीनेच पोळा झाल्यानंतर यंदा मोठा उत्साह दिसून आला. .
वाई (गोरखनाथ) येथे ७०० वर्षांपासून दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर निमित्त ऐतिहासिक बैलपोळा साजरा केला जातो. गोरखनाथ देवस्थानाला प्रदक्षिणा घालण्याकरिता जिल्ह्यासह परजिल्ह्यातील बैलजोड्या येथे येतात. गोरखनाथाचे दर्शन घेतल्यास बैलांना कोणताच आजार होत नाही, अशी आख्यायिका सांगितली जाते.
वाई गोरखनाथ संस्थान व गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची नाष्टा व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येते. बैलांसाठीही चारा व्यवस्था येथे मोफत उपलब्ध करुन दिला जातो. तसेच जिल्हा परिषद पशु संवर्धन विभागाच्या वतीने पशुधनाची मोफत आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यासाठी शिबिरही घेण्यात आले. यात्रेच्या पार्श्वभूमीवर होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेऊन वसमत ते औंढा या महामार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने ती वळविण्यात आली होती. या पोळ्यासाठी यंदा जवळपास ३५ हजार बैलजोड्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत हजेरी लावली होती. यंदा जवळपास ५० हजार बैलजोड्या हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.