शिष्यवृतीचे एससी, व्हीजेएनटीचे ७ हजार अर्ज निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:19+5:302021-04-23T04:32:19+5:30
उच्च माध्यामिक ते वरीष्ठ महाविद्यालय स्तरावरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या व्हीजेएनटी व एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने शिष्यवृती ...
उच्च माध्यामिक ते वरीष्ठ महाविद्यालय स्तरावरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या व्हीजेएनटी व एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने शिष्यवृती देण्यात येते. सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रासाठी शिष्यवृती अर्ज मागण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत दोन्ही प्रवर्गातील एकूण ८ हजार ५४५ अर्ज समाजकल्याण विभागाकडे ऑनलाईन प्राप्त झाले होते. यामध्ये एससी प्रवर्गातील ४ हजार ४८१ तर व्हीजेएनटी प्रवर्गातील ४०६४ अर्जांचा समावेश आहे. समाजकल्याण विभाग स्तरावर यातील ७ हजार ४३५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. यात एससी प्रवर्गातील ३ हजार ७८५ तर व्हीजेएनटी प्रवर्गातील ३ हजार ६५० अर्जाचा समावेश आहे. अर्ज निकाली काढण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाविद्यालय स्तरावर १११० अर्ज प्रलंबित
समाजकल्याण विभागाकडे परिपूर्ण अर्ज आल्यानंतर हे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. मात्र महाविद्यालय स्तरावर तब्बल १ हजार ११० अर्ज प्रलंबित आहेत. या अर्जात त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. त्रुटी दूर झाल्यानंतर हे अर्जही निकाली काढण्यात येणार आहेत.
शिष्यवृती अर्ज भरण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
कोरोनामुळे शिष्यवृती अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत आहे. अर्ज सादर करण्यास प्रवेश पावती, बोनाफाईड प्रमाणपत्र आदी कागदपत्रे लागत आहेत. मात्र संचारबंदीमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी गावाकडे परतले आहेत. यातून अर्ज सादर करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेच शिष्यवृती अर्ज भरण्यास ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.