११ महिन्यांत ७६ दुचाकी चोरीला; १५ दुचाकींचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:20 AM2021-01-01T04:20:35+5:302021-01-01T04:20:35+5:30
गत काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा ...
गत काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आलेली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२० या वर्षांत ७६ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. पकडलेल्या गाड्यांची शहनिशा करुन दस्तावेजाची पाहणी करत संबंधित मालकांना गाडी सुपूर्द केली जाते. यावर्षांत १५ दुचाकी शाेधण्यात आल्या आहेत. काही चोरटे गाडी चोरण्यात पटाईत असतात. तेव्हा नागरिकांनी आपले वाहन काळजीपूर्वक व्यवस्थितरित्या लाॅक करून व्यवस्थित ठेवले पाहिजे. वाहनांची सुरक्षा ही स्वत: गाडी मालकानेच करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संधी पाहून चोरटे गाडी चोरतात
शहरात असे अनेक वाहनधारक आहेत. जे आपल्या वाहनांना लाॅक न लावता इतरत्र जातात. बाजारात तर असा प्रकार नेहमीच पहायला मिळतो. काही दुचाकी चोरटे बाजारात हीच संधी साधून असतात. चोरटे वाहनावर पाळत ठेवून दुसऱ्यां दडून बसलेल्या चोरट्याला कळवून चोरी करतात.
१७ चोरटे पकडले
हिंगोली शहरात व जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण अनेक दिवसांपासून वाढले आहे. वाहनधारकांची मागणी लक्षात घेऊन पोलिसांनी चोरट्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली. दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. चोरीच्या गुन्ह्यातील वाहनांची शोध मोहीम यापुढे सुरु राहणार आहे.
वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना पकडल्यानंतर त्याच्यावर रितसर चोरीचा गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर चार्टसीट तयार करुन चोरट्यास न्यायालयात हजर केले जाते. जानेवारी ते डिसेंबर पर्यत ७६ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. १७ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, एलसीबी, हिंगोली