पाठ्यपुस्तकांचा ८0 टक्के पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:21 AM2018-06-05T00:21:18+5:302018-06-05T00:21:18+5:30
: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शिक्षा अभियानकडून मोफत पाठ्यपुस्तक योजना २०१८-१९ अंतर्गत वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र औरंगाबाद यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्याला ७९.९७ टक्के मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. १५ जून रोजी शाळा उघडताच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तक पडणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शिक्षा अभियानकडून मोफत पाठ्यपुस्तक योजना २०१८-१९ अंतर्गत वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र औरंगाबाद यांच्यातर्फे हिंगोली जिल्ह्याला ७९.९७ टक्के मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. १५ जून रोजी शाळा उघडताच विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तक पडणार आहेत.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा उघडण्यापूर्वी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. विविध विषयांची पाठ्यपुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाली असून लवकरच केंद्र व शाळा स्तरावर वाटप प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जिल्ह्यात १ ली ते ८ वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५४ हजार ८६३ आहे. या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरावरून पुस्तकांची मागणी करण्याच्या सूचना होत्या. तालुका स्तरावरून मागणी केल्याप्रमाणे ६ लाख ५३ हजार ७५६ पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. इयत्ता पहिलीची पुस्तकांची छपाई सुरू आहे. त्यामुळे पहिल्या वर्गाची पुस्तके वगळता पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला आहे. लवकरच पहिल्या वर्गाचीही पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील, असे शिक्षण विभागाने सांगितले. शिक्षण विभागाला मागणी प्रमाणे पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे पुस्तकांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. जवळपास ८० टक्केच पुस्तके उपलब्ध झाली आहेत. परंतु याबाबत नियोजन किंवा आवश्यकतेनुसार परत मागणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
हिंगोली तालुक्यात पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची संख्या ३४ हजार ५८८ असून या विद्यार्थ्यांसाठी १ लाख ८३ हजार ३२६ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यात १ ते ८ चे २४ हजार ६०५ विद्यार्थी असून १ लाख २९ हजार ६७० पाठ्यपुस्तकांची मागणी केली.
सेनगाव तालुक्यात २६ हजार २४२ विद्यार्थी संख्या असून १ लाख ३७ हजार ९०३ पाठ्यपुस्तकांची मागणी आहे. कळमनुरी विद्यार्थी संख्या १२ हजार ८१८ असून १ लाख ५७ हजार ९६५ पुस्तकांची मागणी केली.
वसमत तालुक्यात पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची ३९ हजार ६१० विद्यार्थी संख्या असून २ लाख ८६ हजार २ पुस्तकांची तालुकास्तरावरून मागणी करण्यात आली आहे.