‘पूर्णे’ साठी ८०.५४ टक्के मतदान; ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
By यशवंत भीमराव परांडकर | Published: July 9, 2023 06:44 PM2023-07-09T18:44:01+5:302023-07-09T18:44:10+5:30
११ जुलै रोजी मतमोजणी व निकाल; परीवर्तन की पुन्हा दांडेगावकर याकडे लागले लक्ष
इस्माईल जहागिरदार, वसमत (जि. हिंगोली): पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी ९ जुलै रोजी ८०.५४ टक्के मतदान झाले. २१ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी ‘आयटीआय’ मध्ये मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येणार आहे. २१ हजार ५२० पैकी १७ हजार ३३२ मतदारानी ८०.५४ टक्के मतदानाचा हक्क बजावला. ५३ मतदान केंद्रांवर ४४१ कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. निवडणुकीत परीवर्तन की पुन्हा दांडेगावकर बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे. शेवटपर्यंत निवडणुकीत अटीतटीचा सामना दिसून आला.
वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना २१ संचालकांच्या निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात होते. एकूण २१ हजार ५२० मतदार २१ संचालक निवडून देणार होते. निवडणुकीसाठी ९ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत २१ हजार ५२० पैकी १७ हजार ३३२ असे एकुण ८०.५४ टक्के मतदान झाले. रविवारी सकाळपासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वसमत शहरासह ५३ मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ८०.५४ टक्के मतदान झाले. शेवटपर्यंत मतदारात मतदानासाठी मोठी चुरस दिसून आली. मतदानाची टक्केवारी ७० ते ७५ पर्यंत राहील, असे दिसत होते. परंतु निवडणुकीत ८०.५४ टक्के मतदान झाले. वाढत्या टक्केवारीचा फटका कोणत्या पॅनलला बसणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी विकास देशमुख, तहसीलदार शारदा दळवी, किशोर धुतमल, अनिल पाटील यांनी लक्ष ठेवले होते. ५३ मतदान केंद्रांवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ‘पूर्णे’ साठी सर्व मतदान केंद्रांवर ८०.५४ टक्के मतदान शांततेत झाल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.
उमेदवारांना प्रचारास मिळाले अवघे ३ दिवस...
निवडणुकीचा प्रचार रंगात येताच २८ जून रोजी सहकार विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत निवडणूक पुढे ढकलल्याचा आदेश प्राप्त झाला होता. ९ दिवस प्रचार थंड पडला होता. खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती. ५ जूलै रोजी खंडपिठाने ‘पूर्णा’ ची निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. ३ दिवस उमेदवारांना मतदारांच्या भेटीसाठी वेळ मिळाला. वाढती मतदानाची टक्केवारी कोणासाठी लाभदायक ठरणार ? हे ११ जुलै रोजी मतमोजणीनंतर कळेल.
‘पूर्णे’ वर सत्ता कोणाची...
शेतकरी विकास पॅनल व त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी विकास परीवर्तन पॅनलने प्रचारात आघाडी घेत आपली बाजू मांडली. मतदारात ऊस गाळपास न नेल्याची शेवटपर्यंत नाराजी दिसून आली. शनिवारच्या भेटीत खरी जादू झाली तर निवडणुकीचे निकाल आश्चर्यचकीत लागतील, कोण बाजी मारणार, यावर तालुक्यात पैजा लागण्यास सुरुवात झाली आहे. ‘पूर्णे’ चे कार्यक्षेत्र नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यांत आहे. निवडणुकीचा निकाल काहीही लागो दोन्ही पॅनलमध्ये शेवटपर्यंत अटीतटीचा सामना पहावयास मिळाला.
११ जुलै रोजी मतमोजणी....
पूर्णा कारखान्यासाठी झालेल्या मतदानाची ‘आयटीआय’ येथे ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरु होणार आहे. आयटीआय येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.