जिल्ह्यात ८१ टक्के खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:57+5:302021-07-21T04:20:57+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनसारख्या पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केली होती. मात्र ...
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनसारख्या पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने पेरणीला ब्रेक लागला होता. पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे पुन्हा पेरणीला गती आली. आतापर्यंत जिल्ह्यात ८१.७९ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीन पिकाची झाली असून, सर्वसाधारण पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणीची टक्केवारी १५२.३३ वर पोहोचली आहे. सोयाबीनला मिळालेला भाव लक्षात घेता, शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र कमी करून सोयाबीनचा पेरा केला. हळद पिकाखालील क्षेत्रही यावर्षी दहा टक्क्यांनी वाढले असून, आतापर्यंत ४९७६३ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली. त्यानंतर ज्वारी ९.५३ टक्के, खरीप मका ४१.८५, तूर ६८.७२, मूग २३. ८१, उडीद ३५.५२, तिळाची ३.६६ टक्के पेरणी झाली असून, कापसाची ३६.६९ टक्के लागवड झाली आहे. यावर्षी मूग, उडीद पिकाचा पेरा कमी झालेला आढळून येत आहे. शेतकरी आंतरपीक म्हणून या पिकाला पसंती देत आहेत.
हिंगोली तालुक्यात सर्वाधिक पेरणी
जिल्ह्यात ८१.७९ टक्के पेरणी पूर्ण झाली असली, तरी यामध्ये सर्वाधिक पेरणी हिंगोली तालुक्यात झाली आहे. त्यानंतर सेनगाव तालुक्यात ९४.८४ टक्के, कळमनुरी ९२.३० टक्के, औंढा ७०.७५ टक्के, तर वसमत तालुक्यात ४२.४५ टक्के पेरणी झाली आहे.