८६ जणांना शेळीगट मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:11 AM2017-11-30T00:11:07+5:302017-11-30T00:11:14+5:30
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दुग्धव्यवसाय व शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनास चालना देण्यासाठी शेळीगट योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये विशेष घटकाला २0 तर आदिवासी उपाययोजनेत २८ लाखांचा निधी असून यात केवळ ८६ जणांनाच लाभ देणे शक्य आहे.
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दुग्धव्यवसाय व शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनास चालना देण्यासाठी शेळीगट योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये विशेष घटकाला २0 तर आदिवासी उपाययोजनेत २८ लाखांचा निधी असून यात केवळ ८६ जणांनाच लाभ देणे शक्य आहे.
हिंगोली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. शेतीवरच अवलंबून असलेल्यांची संख्याही अधिक आहे. त्या तुलनेत इतर उद्योग, व्यवसाय नसल्याने वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. तर स्थलांतरही मोठ्या प्रमाणात होते. या भागातच लोकांना रोजगार मिळण्यासाठी शेळीगट, म्हैस गट आदी उपाय योजने ही चांगली बाब आहे. मात्र जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला आधीच अपुरा निधी मिळतो. काही निधी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला दिला जातो. त्यांच्याकडेही पशुपालन, पक्षीपालन योजना आहे. जि.प.च्या पशुसंवर्धन विभागास विशेष घटक योजनेत २0 लाख मिळाले होते. यामध्ये ३७ जणांनाच लाभ देणे शक्य आहे. यात १0 शेळ्या व एक बोकड असा एक गट असतो. यासाठी ५३ हजार ४२९ एवढे शासकीय अनुदान आहे. तर १७ हजार ८१0 रुपये एवढा लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. म्हणजे ७५ टक्के अनुदानावर हे वाटप करण्यात येते. विशेष घटक योजनेत १२ डिसेंबपर्यंत अर्ज सादर करण्यास मुभा आहे. त्यानंतर छाननी व लाभार्थी निवड होईल.
आदिवासी उपाययोजनेतही २८ लाखांचा निधी आहे. विशेष घटकप्रमाणेच या योजनेचे निकष आहेत. अनुदान व लाभार्थी हिस्साही तेवढाच भरावा लागणार आहे. यात २८ लाखांचा निधी आहे. ४९ जणांना लाभ देणे शक्य आहे. यासाठीची अर्जप्रक्रिया झालेली आहे. आता छाननीचे काम सुरू आहे.