८९ ग्रामपंचायती आल्या पीएफएमएसवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:29 AM2021-07-29T04:29:52+5:302021-07-29T04:29:52+5:30
हिंगोली जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींकडून पीएफएमएस प्रणालीवरून सगळे व्यवहार करायचे असल्याने ही प्रणाली सुरू करण्यात अडचणी येत असल्याने ओरड होत ...
हिंगोली जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतींकडून पीएफएमएस प्रणालीवरून सगळे व्यवहार करायचे असल्याने ही प्रणाली सुरू करण्यात अडचणी येत असल्याने ओरड होत आहे. मात्र काही ग्रामपंचायतींनी यासाठी टाळाटाळही चालविली आहे. यापूर्वी ‘लोकमत’मधून याबाबत वृत्त आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, उपमुकाअ मिलिंद पोहरे यांनी सर्व पंचायत समित्यांना सूचित करून पीएफएमएसवर जुनी माहिती अद्ययावत करण्यासाठी मोहीम आखली होती. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींची डिजिटल साईनची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. आता माहिती अद्ययावत केल्यानंतर व्यवहार सुरळीत होतील, याची काळजी घ्यायची आहे. मात्र अनेक ठिकाणी त्यासाठी आवश्यक दस्तावेजच ग्रामसेवकांमार्फत उपलब्ध करून दिले जात नसल्याची समस्या समोर येत आहे. पूर्वी प्रशासन सतर्क नव्हते, आता ते सतर्क झाले, तर खालच्या यंत्रणेत ताळमेळ नाही. त्याचा फटका म्हणून ग्रामपंचायतींची विकास कामे ठप्प झाली आहेत.
कामाला गती मिळणे अपेक्षित
मागील दीड ते दोन महिन्यांपासून पीएफएमएस प्रणालीवरून ओरड सुरू आहे. आतापर्यंत ५० टक्के ग्रामपंचयतींचा कारभार तरी या प्रणालीवरून रुळावर येणे अपेक्षित होते. मात्र तसे होताना दिसत नाही. काही ग्रामपंचायतींमध्ये याला जणू विरोधच आहे. सगळे व्यवहार ऑनलाईन करावे लागणार असल्याने सरपंच नाखूश आहेत. मात्र काहींनी १५ लाखांपर्यंतची कामे करण्याचा अधिकार ग्रा.पं.ला असल्याने त्या चौकटीत कामे करण्याची तयारी चालविली आहे.
ग्रामपंचायतींना सूचना व मदतही
ग्रामपंचायतींनी पूर्ण व्यवहार पीएफएमएसवर करण्यासाठी वारंवार सूचना देण्यात येत आहेत. शिवाय ही प्रणाली विकसित करण्यासाठी अपेक्षित मदत पंचायत विभागाकडून केली जात आहे. जर यात दिरंगाई केली तर कारवाईची शिफारस करावी लागेल, असे उपमुकाअ डॉ. मिलिंद पोहरे यांनी सांगितले.
तालुकानिहाय परिस्थिती
तालुका एकूण ग्रा. पं. पीएफएमएस ग्रा. पं.
सेनगाव १०७ ४५
हिंगोली १११ १०
वसमत ११९ १२
कळमनुरी १२५ १३
औंढा १०१ ९