आवक वाढल्याने इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले; पैनगंगा काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा
By विजय पाटील | Published: August 5, 2022 03:46 PM2022-08-05T15:46:08+5:302022-08-05T16:07:02+5:30
इसापूर धरणात पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, अनसिंग, सीरसम व खंडाळा या क्षेत्रातील पाणी येत आहे.
कळमनुरी/हिंगोली: तालुक्यालगत असलेल्या इसापूर धरणाचे ९ दरवाजे ५ ऑगस्ट रोजी पाण्याचा येवा पाहता सकाळी दहा वाजता पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणाखालील गावांना धरण प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या इसापूर धरणाचे गेट क्रमांक २, १४, ८, ७,९ ,६,१०,५,११ हे नऊ दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले असून धरणाचे पाणी पैनगंगा नदीपात्रात १४६१५ क्युसेक्स (४१३.८४६) इतके पाणी सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे व कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पैनगंगा नदीच्या दोन्ही काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
मच्छीमारांनी पैनगंगा नदीपात्रात जाऊ नये..
याबाबत प्रशासकीय स्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत. इसापूर धरणात पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, अनसिंग, सीरसम व खंडाळा या क्षेत्रातील पाणी येत आहे. सध्या धरण परिसरात ७०१ मिमी पाऊस झाला आहे. पैनगंगा नदीच्या काठावर तीस ते चाळीस गावे येतात तर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, गागापूर, डोंगरगाव नाका ही तीन गावे येतात. उर्ध्व पैनगंगा प्रकल्प व्यवस्थापनाचे उपविभागीय अभियंता एच. एस. धुळगुंडे यांनी पत्र काढून कळमनुरी, पुसद, उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर या तालुक्यातील तहसीलदारांना कळविले आहे. पैनगंगा नदीच्या दोन्ही काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.