मोठी बातमी! १ कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह ९ जण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 06:08 PM2023-02-02T18:08:34+5:302023-02-02T18:09:25+5:30
औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले
औंढा नागनाथ (हिंगोली): पेट्रोलिंग दरम्यान ग्रामीण रुग्णालय परिसरात बुधवारी रात्री पोलिसांनी काही संशयिताना ताब्यात घेतले. अधिक माहिती घेतली असता सर्वजण बनावट नोटा पसरवणारी टोळीतील असल्याचे उघडकीस झाले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ९ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ कोटी १४ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
औंढा नागनाथ येथील पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे हे कर्मचाऱ्यांसह बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरांमध्ये पेट्रोलिंग करत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाजवळ रस्त्याच्याकडेल एका गाडीजवळ एक महिला व सहा जण आपसात वाद करीत होते. संशयावरून पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात ३९ लाख रुपये आढळून आले. संशयितांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली.
परंतु, एका महिलेने १२ लाख ५० हजार घेऊन 39 लाख रुपयाच्या बनावट नोटा देऊन काहीजण चारचाकीने पसार झाल्याने सांगितले. झुंजारे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गाडीचा पाठलाग करून खामगाव येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनही 75 लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. अशा एकूण १ कोटी १५ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड, दत्ता ठोंबरे, प्रकाश आवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार संदीप टाक, माधव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गोरे, अमोल चव्हाण, सचिन मस्के ,वसीम पठाण, विलास पाईकराव, मदतनीस राहुल मोगले यांच्या पथकाने केली.