जिल्ह्यात पाचवी ते दहावीच्या ९० शाळा अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:30 AM2021-02-10T04:30:17+5:302021-02-10T04:30:17+5:30

कोरोनामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे ...

90 schools from 5th to 10th are still closed in the district | जिल्ह्यात पाचवी ते दहावीच्या ९० शाळा अद्याप बंदच

जिल्ह्यात पाचवी ते दहावीच्या ९० शाळा अद्याप बंदच

Next

कोरोनामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरू करताना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे शाळा निर्जंतुकीकरण करणे, कोरोना टेस्ट यासह विद्यार्थ्यांना मास्क व शारीरिक अंतर पाळणे यासंदर्भात मार्गदर्शन करणे आदी कामे शाळा प्रशासनाला करावी लागत आहेत. त्यामुळे अद्याप पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या नसल्याचे पाहावयास मिळत आहेत. काही शाळांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाहीत, तर काही शाळांचे प्रस्ताव नाकरण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित शाळा कधी सुरू होणार याकडे पालकांसह, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

शाळा बंद असल्याची कारणे

कोरोनानंतर शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार शाळांना शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. या प्रस्तावांची पाहणी करून शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला सूचना करतात. मात्र, जिल्ह्यातील काही शाळांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाहीत, तर काही शाळांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने शिक्षण विभागाने हे प्रस्ताव फेटाळले आहेत.

एकही शिक्षक, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही

शाळा सुरू करण्याअगोदर शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू झालेल्या शिक्षकांनी कोरोना टेस्ट करून घेतल्या आहेत. मात्र, यामध्ये एकही शिक्षक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती

पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा

३०४

--------

सुरू झालेल्या शाळा

२४१

----------

विद्यार्थी संख्या

एकूण संख्या

१२२५७५

-------

उपस्थित विद्यार्थी

९३९७०

प्रतिक्रिया

शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शालेय व्यवस्थापन समितीचा प्रस्ताव व शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल आल्यानंतर प्रस्तावांची छाननी केली जात आहे, तसेच परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येत आहेत. त्यांच्या मान्यतेनंतरच शाळा सुरू करण्यात येत आहेत.

-पी.बी. पावसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

-----------

Web Title: 90 schools from 5th to 10th are still closed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.