जिल्ह्यातील ९१ वाळूघाटांचे होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:10 AM2018-08-19T00:10:55+5:302018-08-19T00:11:16+5:30
गतवर्षी वाळूघाट लिलावातून अवघा ७ लाखांचा महसूल मिळाला होता. तर वाळू चोरीच्या ५२ प्रकरणांत ८२ लाखांचा दंडच वसूल झाला होता. यंदा एप्रिलमध्ये गेलेल्या दोन घाटांमुळे आधीच ४0 लाखांचा महसूल मिळालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गतवर्षी वाळूघाट लिलावातून अवघा ७ लाखांचा महसूल मिळाला होता. तर वाळू चोरीच्या ५२ प्रकरणांत ८२ लाखांचा दंडच वसूल झाला होता. यंदा एप्रिलमध्ये गेलेल्या दोन घाटांमुळे आधीच ४0 लाखांचा महसूल मिळालेला आहे. आता नव्याने ९१ वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी वाळूघाट लिलावात कंत्राटदारांनी भागच न घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मार्चपूर्वी केवळ कसबे धावंडा हा एकच घाट गेला होता. त्यानंतर पुन्हा लिलावाची प्रक्रिया झाली. मात्र दर कमी होण्याची वाट पाहणाऱ्या कंत्राटदारांनी पाठ फिरविली होती. नंतर लिलाव तर झाला मात्र न्यायालय आदेशामुळे पुन्हा त्यावर पाणी फेरले गेले होते. एप्रिलमध्ये दोन घाट ३८ लाखांच्या लिलावात गेले.
आता खनिकर्म, महसूल व भूजल सर्वेक्षण विभागाकडून वाळूघाटांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणासाठी ९१ वाळूघाट प्रस्तावित केले आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आल्यामध्ये जमा आहे. लवकरच त्याचा अहवाल विभागीय आयुक्तालयाकडे जाणार आहे. त्यानंतर या सर्व घाटांचे खानकाम व पर्यावरणीय आराखडे तयार करावे लागणार आहेत. त्यानंतर पर्यावरण मान्यता मिळाल्यास या घाटांचा लिलाव करणे शक्य होणार आहे. यंदा ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पावसाळ्यानंतर लागलीच वाळूघाट उपलब्ध होतील, यासाठी नियोजन करण्याचा प्रयत्न होत आहे.
पात्र किती ठरणार?
दरवर्षी ७0 ते ७५ पेक्षा जास्त वाळूघाटांचे सर्वेक्षण करण्यात येते. मात्र नंतर काही ठिकाणी नदी प्रवाहित असल्याने किंवा बॅरेजेसचा जलसाठा असल्याने ते आधीच या यादीतून बाद होतात. काही ठिकाणी पाणीच न वाहिल्याने वाळू आली नाही,त्यामुळे मोठी अडचण होते. परिणामी हे घाट बाद होतात. काही भागातील ठरावीक घाटच दरवर्षी लिलावासाठी उपलब्ध होतात. मुळात याच भागात वाळू निघते. त्यामुळे कंत्राटदारांचीही याच घाटांना पसंती असते. त्यामुळे यंदा ९१ पैकी किती घाट लिलावाच्या प्रक्रियेपर्यंत यादीत राहतील, हा यक्षप्रश्न आहे. तूर्ततरी बांधकाम क्षेत्रातील लोकांना वाळूघाट लिलावाची अपेक्षा आहे.