गळ्याला चाकू लावून दुचाकीचालकास लुटले; कयाधू नदी परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 03:08 PM2023-04-18T15:08:49+5:302023-04-18T15:10:13+5:30
कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हिंगोली: दुचाकी अडवून गळ्याला चाकू लावून चालकाकडील ४ हजार रुपये काढून घेतले. ही घटना हिंगोली शहराजवळील कयाधू नदी परिसरात १७ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता घडली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विवेक गणपतराव अलमूलवार (रा. हरण चौक, बुरुडगल्ली हिंगोली) हे सोमवारी रात्री ७ वाजता दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी कयाधू नदी परिसरात वंजारवाडा भागाकडे जाणाऱ्या रोडवर आली असता हिंगोली शहरातील एकाने अलमूलवार यांची दुचाकी अडवली. त्यानंतर गळ्याला चाकू लावून तुझ्याजवळील पैसे आताच दे म्हणाला. यावर माझ्याजवळ पैसे नाहीत असे म्हणतात शिवीगाळ करून अलमूलवार यांना थापडांनी मारहाण केली. तसेच उजव्या हातावर चाकूने मारून जखमी केले.
खिशातील ४ हजार रुपयेही जबरीने काढून घेतले. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी विवेक अलमूलवार यांच्या फिर्यादीवरून करण बालाजी बांगर (रा. वंजारवाडा, हिंगोली) याच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.