हिंगोलीत शिंदे सेनेला झटका; उमेदवार बदलला, पण भाजपाच्या तिसऱ्या बंडखोराचा अर्ज दाखल
By विजय पाटील | Published: April 4, 2024 05:11 PM2024-04-04T17:11:39+5:302024-04-04T17:12:24+5:30
शिंदे सेनेने उमेदवार बदलून भाजपसमोर लोटांगण घातल्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. तीन तीन जण बंडखोरी करण्याची तयारी करीत आहेत.
हिंगोली : भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रामदास पाटील यांनी उमेदवारी भरल्याने भाजपमधील दुफळी समोर आली आहे. शिंदे गटाला डाव देण्यासाठी हा प्रकार घडत आहे की, खरेच ही मंडळी नेत्यांचे ऐकत नाही, हे कळायला मार्ग नाही.
हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या मंडळींपैकी अर्ज दाखल करणारे रामदास पाटील हे तिसरे उमेदवार आहेत. काल श्याम भारती महाराज यांनी व वसमतचे अॅड. शिवाजी जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. जाधव यांनी मागच्या वेळीही वसमत विधानसभेत बंडखोरी केली होती. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर त्यांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे कधी दाखविले नाही, मात्र अचानक अर्जच दाखल केला. मागच्या वेळी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांना पाडण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर भाजपने त्यांना जिल्हाध्यक्षपदाची बक्षिसीही दिली होती. मात्र ते पद त्यांना झेपावले नाही. तर श्याम भारती महाराज यांनीही लोकसभा इच्छुक असून यावेळी निवडणूक लढणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. ठरावीक भागातील भक्तगण एवढीच त्यांची ताकद मात्र तरीही भाजपचा बंडखोर म्हणूनच त्यांचे नाव पुढे येणार आहे, हे निश्चित.
रामदास पाटील यांनी तर भाजपकडून उमेदवारी निश्चित असल्याचे समजत प्रचार सुरू केला होता. यात त्यांचा खा.हेमंत पाटील यांच्याशी वादही झाला होता. खासदारांनी झापल्याचे त्यांनी जाहीर मंचावरून सांगितले होते. मात्र उमेदवार बदला नाही तर भाजपला जागा द्या म्हणणाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांच्यासोबत या मंचावर असलेले इतर नेते आता शिंदे गटाच्या उमेदवारासोबत दिसत आहेत. मात्र पाटील यांच्यासोबत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी संधान साधत त्यांची उमेदवारी भरण्यासाठी साथ दिली. यामुळे भाजपमध्ये कार्यकर्ते आमचे ऐकत नाहीत, अशी जी बोंब ठोकली जात होती, त्यामागे हेच कारण असल्याचे दिसत आहे.
शिंदे सेनेने उमेदवार बदलून भाजपसमोर लोटांगण घातल्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. तीन तीन जण बंडखोरी करण्याची तयारी करीत आहेत. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत या मंडळींना भूमिका निश्चित करावी लागणार आहे. भाजपकडून हा बंडखोरीचा डाव पूर्वनियोजित आहे की, भाव वाढवून घेण्यासाठी ही मंडळी रिंगणात येवून भीती घालत आहे? असा सवालही उपस्थित केला जात आहे. हे उमेदवार रिंगणात कायम राहिले तर शिंदे सेनेला फटका बसणार असल्याचे दिसत आहे.