सापडलेला मोबाइल वापरणाऱ्याकडून ५ हजारांची लाच, सायबरच्या पोलिस अंमलदारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 04:34 PM2024-05-10T16:34:10+5:302024-05-10T17:03:31+5:30
कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजारांची लाच, सायबरच्या पोलिस अंमलदारावर गुन्हा
हिंगोली : सापडलेला मोबाइल गैर पद्धतीने वापरत असल्याचे सांगून कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सायबर पोलिस अंमलदारावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ९ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. लाचखोर अंमलदारास अटक करण्यात आली आहे.
बोरी शिकारी (ता.हिंगोली) येथील तक्रारदार हे मार्च २०२३ मध्ये हिंगोली ते सायाळा गावाकडे जात असताना त्यांना गारमाळ उड्डाण पुलाजवळ एक मोबाईल सापडला होता. नातेवाईकांच्या नावे असलेले सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकून ते वापरत होते. दरम्यान २२ एप्रिल २०२३ रोजी त्यांना सायबर सेल हिंगोली येथील पोलिस अंमलदार दिपक पाटील यांनी मोबाईल घेऊन त्यांना बोलविले. त्यामुळे तक्रारदार हे सदर मोबाईल घेऊन सायबर सेलला दाखल झाले.
तेथे पोलिस अंमलदार दिपक पाटील यांनी तक्रारदार यांना सापडलेला मोबाईल जमा करण्यास सांगितले. सदरचा मोबाइल गैर पद्धतीने वापरत असल्याचे सांगून कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच तडजोडी अंती ५ हजार रूपयांची लाच फोन पे द्वारे स्विकारली.
याबाबत तक्रारदार यांना आपल्याकडून घेतलेली रक्कम ही लाच असल्याची खात्री झाल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रारी अर्ज केला होता. या तक्रारी अर्जाच्या चौकशी अहवालावरून पोलिस अंमलदार दिपक हरिदास पाटील (रा.रामकृष्णा सिटी, बळसोंड, हिंगोली) यांचेवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. लाचखोर पोलिस अंमलदारास अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, हिंगोलीचे उप अधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर तपास करीत आहेत.