क्रेडिट सोसायटीच्या अपहारप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल
By विजय पाटील | Published: July 18, 2023 04:15 PM2023-07-18T16:15:22+5:302023-07-18T16:15:43+5:30
खातेदार आपल्या खात्यावरील रकमा पाहत होते; परंतु अनेक खातेदारांच्या रकमा खात्यातून गायब झाल्याने त्यांचे चेहरे पडलेले दिसले.
कळमनुरी (जि. हिंगोली) : येथील बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत झालेल्या अपहारप्रकरणी बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह इतर तिघांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
क्रेडिट सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक गजानन रहाटे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन शाखा व्यवस्थापक वसंत घुगे, सहायक शाखा व्यवस्थापक संजय भोयर, रोखपाल गजानन कुलकर्णी व इतर कर्मचाऱ्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी संगनमत करून १ जानेवारी २०२१ ते १ जुलै २०२३ पर्यंत खातेदारांच्या रोख रकमा त्यांच्या खात्यावर जमा न करता आपल्या आर्थिक फायद्यासाठी त्याचा गैरवापर करून संस्था व खातेदारांची अंदाजे ७० ते ८० लाख रुपयांची फसवणूक केली आहे, असे त्यांनी कबूल केले व संबंधित खातेदारांचे पैसे परत करतो, असे सांगितले; परंतु त्यांनी परत केले नाही. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे हे करीत आहेत.
दरम्यान, वसंत घुगे व संजय भोयर हे दोघे फरार असून रोखपाल गजानन कुलकर्णी व इतर एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी १८ जुलै रोजी येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बुलढाणा अर्बन को-आपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये अपहार झाल्याची माहिती मिळल्यानंतर १७ व १८ जुलै रोजी खातेदारांनी एकच गर्दी केली होती. खातेदार आपल्या खात्यावरील रकमा पाहत होते; परंतु अनेक खातेदारांच्या रकमा खात्यातून गायब झाल्याने त्यांचे चेहरे पडलेले दिसले. दुसऱ्या दिवशीही बँकेत खातेदारांची एकच गर्दी झाली होती. दिवसभर बँकेच्या घोटाळ्याबाबतच चर्चा सुरू होती.