अखेर खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 07:51 AM2023-10-04T07:51:25+5:302023-10-04T08:56:27+5:30

येथील शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले आहेत

A case under Atrocity has been filed against MP Hemant Patil in case of nanded hopital dean | अखेर खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

अखेर खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

googlenewsNext

नांदेड - येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडाच्या घटनेनंतर खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेत अतिगंभीर असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांना धीर दिला. तसेच रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टरांकडून सध्याची परिस्थितीची माहिती घेतली. तद्नंतर रूग्णालयातील स्वच्छतागृहांची पाहणी करताना घाण आढळून आल्याने संतापलेल्या खासदार पाटील यांनी अधिष्ठाता अन् अधिकाऱ्यांना तेथील टॉयलेट साफ करायला लावले होते. या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला. आता, याप्रकरणी खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

येथील शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेने तब्बल ३१ जणांचे बळी घेतले आहेत. त्यामध्ये १६ नवजात बालकांचा समावेश आहे. अतिदक्षता विभागातील घाण, एससी, पंखे बंद अशा असुविधा आणि वेळेत औषधांचा तुटवडा यामुळेच मृत्यूचा आकडा वाढत आहे. मृत्यूचे तांडव घडूनही रूग्णालय प्रशासन आणि शासन झोपेतच असून मंगळवारीदेखील रूग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी बाहेरच्या खासगी मेडिकलची वाट धरावी लागली. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफ यांनीही रुग्णालयाला भेट दिली आहे. 

या घटनेमुळे आणि रुग्णालयाची दयनीय अवस्था झाल्याने खासदार हेमंत पाटील यांनी चक्क रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना टॉयलेट स्वच्छ करायला लावले होते. या प्रकरणाचे वैद्यकीय अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. राजकारण राजकारणाच्या जागी करा, स्टंटबाजीला आमचा विरोध आहे, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याप्रकरणी आता खासदार पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध  ॲट्रॉसिटी आणि शासकिय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल  करण्यात आला. या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हेमंत पाटील आणि अन्य १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तीन दिवसानंतर आयसीयुमध्ये झाली स्वच्छता...

मागील दोन दिवसात ३१ जणांचा मृत्यू होवूनही प्रशासनाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्षच केले जात आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटेपासून स्वच्छता करण्यात येत आहे. नवजात बालक अतिदक्षता विभागात शेकडो किला केरकचरा निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशीच परिस्थिती इतर वार्डातील आहे. केवळ वैद्यकीय शिक्षण मंत्री, पालकमंत्री आणि चौकशी समिती येत असल्याने हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: A case under Atrocity has been filed against MP Hemant Patil in case of nanded hopital dean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.