शेतात फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 01:57 PM2024-08-28T13:57:43+5:302024-08-28T13:58:21+5:30
सोयाबीनची फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेवर पडला पाय
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : शेतात सोयाबीनची फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा जोरदार धक्का बसला. यात तरुण शेतकरी जागीच मृत्युमुखी पडला. ही घटना कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ शिवारात २७ ऑगस्ट रोजी घडली.
कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील तरुण शेतकरी नागेश सूर्यभान मुधोळ (वय ३७) हा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या स्वतःच्या शेतात सोयाबीनची फवारणी करण्यासाठी गेला होता. फवारणी करताना शेतात तुटून पडलेल्या विजेच्या प्रवाहित तारेचा नागेश मुधोळ यास जोरदार धक्का बसला. धक्का बसताच पाठीवरील फवाऱ्यासह शेतकरी खाली कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्यानंतर विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्याला आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
सायंकाळी उशिरापर्यंत त्याचे शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. ठाणेदार विष्णुकांत गुट्टे, बीट जमादार शेख अन्सार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तर वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता यांनीही घटनेचा पंचनामा केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. तरुण शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे बेलमंडळ गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.