बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; भरारी पथकाने १० परीक्षार्थी केले रेस्टिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 06:53 PM2022-03-12T18:53:42+5:302022-03-12T18:54:20+5:30
राजर्षी शाहू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने केली कारवाई
आखाडा बाळापूर ( हिंगोली): आखाडा बाळापूर येथील परीक्षा केंद्रांवर नकलांचा सुळसुळाट सुरू असल्याने कॉपीमुक्त परीक्षांचा कागदी देखावा सुरु असल्याचे दिसून आले आहे. राजर्षी शाहू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने कॉपी करतांना रंगेहात पकडलेल्या 10 परीक्षार्थीवर रेस्टिकीट करण्याची कारवाई केली.
बारावी बोर्डाच्या परीक्षा ४ एप्रिल पासून सुरु झाल्या आहेत .बाळापूर येथे बारावीची दोन परीक्षा केंद्रे आहेत. राजर्षी शाहू हायस्कूल येथील केंद्रांवर सुरळीत परीक्षा सुरू असल्याचे आतापर्यंत दाखविण्यास केंद्रप्रमुखांना यश मिळवले होते. परंतु, आज केंद्रांवर नकलांचा सुळसुळाट सुरू असल्याचे सिद्ध झाले. या परीक्षा केंद्रावर आज रसायनशास्त्र विषयाचे 176 परीक्षार्थीं परीक्षा देत होते.
दुपारी १ वाजेच्या सुमारास प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के व त्यांच्या पथकाने परीक्षा केंद्राची पाहणी केली. यावेळी अनेक परीक्षार्थी नकला करत असल्याचे दिसून आले.पथकाने प्रत्यक्ष नकला करताना आढळून आलेल्या 10 परीक्षार्थींना रेस्टिकीट केले. परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख आर. व्ही. मुपडे, सहकेंद्रप्रमुख एस. एम. उकंडे यांनी कारवाईस दुजोरा दिला.