हिंगोलीत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: October 27, 2023 02:38 PM2023-10-27T14:38:06+5:302023-10-27T14:38:21+5:30
बासंबा पोलिसांची कारवाई : दोन रॉड, चाकू, मिरची पुड जप्त
हिंगोली : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना बासंबा पोलिसांनी पकडले. ही कारवाई तालुक्यातील खानापूर चित्ता परिसरातील पुलाजवळ २६ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री करण्यात आली. यात संशयित दरोडेखोरांकडून चाकू, मिरची पुड, तसेच रॉड जप्त करण्यात आले.
तालुक्यातील बासंबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी, पोलिस उपनिरीक्षक संजय केंद्रे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, डुकरे आदींचे पथक २६ ऑक्टोबर रोजी रात्री गस्त घालत होते. पथक खानापूर चित्ता परिसरात आले असता एका पुलाजवळ काहीजण दरोडा टाकण्याच्या अथवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याचे आढळून आले. पोलिस आल्याचे पाहताच ते पळून जात होते. मात्र तत्पूर्वीच पथकाने यातील पाच जणांना ताब्यात घेतले. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.
विशाल जनार्धन पारसकर, अभय बबन इंगळे (दोघे रा. महादेववाडी मंगळवारा बाजार हिंगोली), अविनाश देविदास मोरे, संदिप अंबादास कुहिरे (दोघे रा. जिल्हा परिषद कॉर्टर हिंगोली) , संदिप संतोष शिंदे (रा. आनंदनगर हिंगोली), गणेश धुकाळ (रा. बावनखोली हिंगोली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचेजवळ चाकू, मिरची पुड व दोन लोखंडी रॉड आढळून आले. पोलिसांनी यातील पाच जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संजय केंद्रे यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी तपास करीत आहेत.