मध्यरात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; घरावरील पत्रे उडाली, साहित्य जळून मोठे नुकसान
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: July 25, 2024 13:48 IST2024-07-25T13:41:14+5:302024-07-25T13:48:48+5:30
हा स्फोट एवढा भीषण होता की घराच्या पत्रावर ठेवलेले दगड, गोटे हे ५० ते ६० फूट उंच हवेत उडून पत्राला छिद्र पाडून खाली पडले.

मध्यरात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; घरावरील पत्रे उडाली, साहित्य जळून मोठे नुकसान
- बापूराव इंगोले
नर्सी नामदेव (जि. हिंगोली): हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे गुरुवारी रात्री १ वाजताच्या सुमारास घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर याच घटनेत पत्रावरील दगड लागल्याने एक महिला जखमी झाली आहे.
नर्सी येथील सुतार गल्लीमध्ये मारोती गणपती वडणकर यांचे पत्राचे घर आहे. स्वयंपाक घरात ठेवलेल्या घरगुती गॅस सिलिंडरचा २५ जुलै रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भिषण होता की घराच्या पत्रावर ठेवलेले दगड, गोटे हे ५० ते ६० फूट उंच हवेत उडून पत्राला छिद्र पाडून खाली पडले. स्फोटात पत्रे देखील अस्ताव्यस्त झाले होते. यातील एक दगड प्रयागबाई वडणकर यांच्या डाव्या हाताला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोट होऊन आग लागल्याने घरातील ज्वारी, गहू, हरभरा डाळ, तूरडाळ, पंखा, फ्रिज, भांडे, कपडे व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीच्या ज्वालांनी एक गायही भाजून जखमी झाली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी नवनाथ वानोळे यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर मलवाड, उपसरपंच ज्ञानेश्वर कीर्तनकार, सुभाष हुले, शाहूराव देशमुख, पांडुरंग गुगळे, बालाजी वरणे आदी उपस्थित होते.