शेतजमीन मोजण्यासाठी ५० हजारांची लाच मागणारा भूमापक एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:09 PM2023-01-30T16:09:25+5:302023-01-30T16:10:06+5:30
भूमापक अधिकाऱ्याने भाजीपाला विक्री करणाऱ्याकडे देण्यास सांगितली लाचेची रक्कम
- इस्माईल जहागिरदार
वसमत ( हिंगोली) :शेत जमीन मोजमापासाठी ५० हजारांची लाच स्वीकारतांना भूमापकासह एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वसमत शहरातील उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयातील भूमापक मारोती घाटोळ यांनी शेत जमीन मोजमापासाठी शेतकऱ्याकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने तक्रारीची शहानिशा केली. दरम्यान, भूमापक घाटोळ याने आज दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान बसस्थानक परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारा चंदू भेदेवाड याच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना खाजगी व्यक्ती चंदू भेदेवाड आणि भूमापक मारोती घाटोळस लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.