पावसाळ्यातील दीड महिना लोटला; हिंगोलीत २६ टक्के, तर नांदेडमध्ये २४ टक्केच पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 19:40 IST2024-07-19T19:40:12+5:302024-07-19T19:40:28+5:30
नांदेड येथील पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात.

पावसाळ्यातील दीड महिना लोटला; हिंगोलीत २६ टक्के, तर नांदेडमध्ये २४ टक्केच पाणीसाठा
हिंगोली : यावर्षीच्या पावसाळ्यातील दीड महिन्याचा कालावधी लोटला असून, त्यात नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २४.२१ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २६.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यावर्षी तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
नांदेड येथील पाटबंधारे मंडळाअंतर्गत नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या नोंदी घेतल्या जातात. नांदेड जिल्ह्यात मानार, विष्णुपुरी हे दोन मोठे प्रकल्प आहेत. मानार प्रकल्पात ३७.२० दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे तर विष्णुपुरी प्रकल्पात ४७.३० दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. नांदेडच्या ९ मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून २९.५९ दलघी आणि ९ उच्च पातळी बंधाऱ्यात २८.९७ दलघमी पाणीसाठा आहे. तर लघू प्रकल्पांमध्ये ३३.२४ दलघमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत २५४ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. त्या तुलनेत सध्या केवळ १७६.२९ दलघमी पाणीसाठा झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात येलदरी हा सर्वात मोठा प्रकल्प असून, त्यात सध्या २४३.६३ दलघमी (३० टक्के) पाणीसाठा झाला आहे. सिद्धेश्वर प्रकल्प अजूनही कोरडाच आहे. तर २७ लघू प्रकल्पांमध्ये ७.६० दलघमी पाणीसाठा आहे. कोल्हापुरी बंधाऱ्यात केवळ १.५२ दलघमी जलसंचय झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील ३ उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये २९.४३ दलघमी पाणीसाठा झाला आहे. दोन कोल्हापुरी बंधाऱ्यात १.४८ दलघमी पाणीसाठा झालेला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९८.२५ दलघमी पाणीसाठ्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात ३०.९२ दलघमी पाणीसाठा झाला आहे.
गतवर्षी होता ४३ टक्के पाणीसाठा
नांदेड, परभणी आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १५२४ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. प्रत्यक्षात ८३० दलघमी पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ३०.३२ टक्के एवढी आहे. मागील वर्षी याच प्रकल्पांमध्ये ११९४.४१ दलघमी पाणीसाठा झाला होता. त्याची टक्केवारी ४३.५९ टक्के एवढी होती.
कोणत्या प्रकल्पात किती टक्के साठा?
मानार : २६.९२
विष्णुपुरी : ५८.५५
येलदरी : ३०.०९
सिद्धेश्वर : निरंक
इसापूर : ३८.४७