गोड बोलून शेजारील प्रवाशाने फसवलं; क्रीम बिस्कीट देऊन बेशुध्द करत अंगठी चोरली
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: August 9, 2023 05:53 PM2023-08-09T17:53:47+5:302023-08-09T17:55:15+5:30
क्रीम बिस्किटमधून गुंगीकारक द्रव्य देवून प्रवाशाची अंगठी घेतली काढून
हिंगोली : क्रीम बिस्किट व पाण्यामध्ये गुंगीकारक द्रव्य देवून बेशुद्ध केलेल्या भामट्याने एका प्रवाशाच्या हातातील १० ग्रॅम वजनाची ४० हजार रूपये किमतीची अंगठी काढून घेतली. हा प्रकार हिंगोली ते शेंबाळपिंपरी प्रवासात एसटीमध्ये ६ ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात ८ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा नोंद झाला.
परभणी जिल्ह्यातील मानवत येथील मधूकरराव दहे हे ६ ऑगस्ट रोजी एमएच १३ सीयु ७४९५ या क्रमांकाच्या अंबेजोगाई ते नागपूर एसटी बसने प्रवास करण्यासाठी बसमध्ये बसले. हिंगोली बसस्थानकातून बस पुढच्या प्रवासाला निघाली. प्रवासादरम्यान एका भामट्या प्रवाशाने दहे यांच्याशी हितगुज साधून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रवासात त्याने दहे यांना क्रिम बिस्किट खायला दिला.
तसेच पाणीही पिण्यासाठी दिले. मात्र काही वेळातच त्यांना गुंगी येऊन ते बेशुद्ध झाले. या संधीचा फायदा घेत भामट्याने दहे यांच्या हातातील ४० हजार रूपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. बस डिग्रस येथे पोहचल्यानंतर हा प्रकार समोर आला. ही माहिती दहे यांनी मुलगा विक्रमसिंह दहे यांना दिली. या प्रकरणी विक्रमसिंह दहे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्याविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मानवी शरीरास अपायकारक असलेले कोणतेतरी गुंगीकारक द्रव्य क्रीम बिस्किट व पाण्यामधून दिले. तसेच हातातील सोन्याची अंगठी काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस अंमलदार संजय मार्के तपास करीत आहेत.
एसटी प्रवासात लुबाडण्याचे प्रकार वाढले
हिंगोली बसस्थानकातून या पूर्वी महिलांच्या गळ्यातील सोन्याची दागिणे, प्रवाशांचे मोबाईल, पैशाचे पाकिट चोरट्यांनी पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. आता प्रवासात एखाद्या प्रवाशाचा विश्वास संपादन करून त्याचे पैसे, दागिणे काढून घेण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी कळमनुरी येथे बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाच्या खिशातील पैसे काढून घेतल्याचा प्रकारही समोर आला आहे.