प्रस्तावाच्या मान्यतेसाठी दहा हजारांची लाच घेताना वरिष्ठ लिपिकास पकडले

By प्रसाद आर्वीकर | Published: October 21, 2024 06:27 PM2024-10-21T18:27:14+5:302024-10-21T18:27:24+5:30

नवीन संगणक मान्यतेचा प्रस्ताव तपासणी करण्याकरिता घेतली लाच

A senior clerk was caught accepting a bribe of ten thousand for accepting the proposal | प्रस्तावाच्या मान्यतेसाठी दहा हजारांची लाच घेताना वरिष्ठ लिपिकास पकडले

प्रस्तावाच्या मान्यतेसाठी दहा हजारांची लाच घेताना वरिष्ठ लिपिकास पकडले

हिंगोली : नवीन संगणकाच्या मान्यतेच्या प्रस्तावाची तपासणी करण्यासाठी फाईल सादर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास २१ ऑक्टोबर रोजी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने १४ ऑक्टोबर रोजी एसीबीकडे तक्रार दिली होती. त्यानुसार  सहशिक्षक गजानन पुंजाजी पळसकर हे सध्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून प्रतिनियुक्तीवर आहेत. तक्रारदाराच्या नावे असलेल्या टाइपरायटिंग अँड शॉर्ट हॅण्ड इन्स्टिट्यूटमध्ये संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी नवीन संगणक मान्यतेचा प्रस्ताव तपासणी करण्याकरिता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे पत्र तयार करून फाईल सादर करण्यासाठी पळसकर हे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत आहेत.

या तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली तेव्हा लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.  त्यावरून २१ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाई केली. त्यात पंचासमक्ष गजानन पळसकर यांनी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. गजानन पळसकर यांच्याविरुद्ध हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. 

ही सापळा कारवाई कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विनायक जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शुक्ला, तानाजी मुंडे, ज्ञानेश्वर पंचलिंग, रवींद्र वरणे, गजानन पवार, भगवान मंडलिक, गोविंद शिंदे, राजाराम कोकाटे, शिवाजी वाघ, योगिता अवचार, शेख मन्नान आदींनी यशस्वी केली.

Web Title: A senior clerk was caught accepting a bribe of ten thousand for accepting the proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.