भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 17:47 IST2023-06-05T17:47:15+5:302023-06-05T17:47:59+5:30
वसमत शहरातील घटना, गंभीर जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले; १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
- इस्माईल जहागिरदार
वसमत: मालेगाव मार्गावरील मंगल कार्यालयजवळ आज दुपारी एका ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अजय बाळासाहेब लडके असे मृताचे नाव आहे.
वसमत शहरातील मालेगाव मार्गावर आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान एका दुचाकीवरून अजय बाळासाहेब लडके ( १३, रा माळवटा) आणि सचिन उतमराव नादरे ( ३०, रा माळवटा ) माळवटाकडे जात होते. दरम्यान, मंगल कार्यालयजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिली. यात दुचाकीवरील अजयचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन गंभीर जखमी झाला. जखमीस नागरीकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यास नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोनि चंद्रशेखर कदम, जमादार शेख हकीम यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी उशिरा पर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.