अचानक आलेल्या वादळाने झोपडीवरील पत्रे उडाली, गारपीटीच्या तडाख्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:59 AM2024-04-10T11:59:31+5:302024-04-10T12:00:08+5:30
कळमनुरीत वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
कळमनुरी ( जि.हिंगोली): कळमनुरी शहरासह परिसरास मंगळवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान वादळी वारा व गारपिटीचा तडाखा बसला. यात तालुक्यातील जटाळवाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
मंगळवारी रात्री अचानक वातावरणात बदल झाला आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीट देखील झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जटाळवाडी येथे वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस सुरू झाल्याने देवराव रुद्राजी बाभळे ( 65) यांनी शेतातील झोपडीचा सहारा घेतला. मात्र, वादळाने झोपडीवरील टीनपत्रे उडून गेली. यातच गारपीटीचा मारा वाढला. थंडी, पाऊस आणि गारपीटीच्या मर्याने हृदयविकाराचा झटका येऊन बाभळे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नायब तहसीलदार आनंदराव सुळे यांनी दिली.
यासोबतच कनका येथेही वादळ वारा व गारांच्या पावसामुळे बापूराव जाधव यांच्या चार शेळ्या, एका गाईचा मृत्यू झाला. तसेच वादळी वाऱ्याने टीनपत्रे उडून दगडाने चार जण जखमी झाले आहेत. कळमनुरी शहरासह मुंढळ, रामवाडी, वाकोडी, आसोलवाडी, मसोड, जटाळवाडी ,कनका, राजुरा ,शिवणी( खुर्द) या परिसरात बागायती पिके पपई, करडई, आंबे, कांद्याच्या बिया व संत्रा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडून घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर झाडेही ऊनमडून पडली आहेत. महावितरणचे विजेचे पोल व तारांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपीटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तलाठ्यांना दिल्या आहेत.