पीकविम्यावरून संतापाचा सूर; गोरेगाव-जिंतूर मार्गावर शेतकऱ्यांनी जाळले टायर
By रमेश वाबळे | Published: January 21, 2023 02:06 PM2023-01-21T14:06:01+5:302023-01-21T14:08:55+5:30
शेतकऱ्यांचे चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण
- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि.हिंगोली) : पीकविमासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मागील चार दिवसांपासून गोरेगाव येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. २० जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळेझेंडे दाखविण्यात आले होते. तर २१ जानेवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
यंदा अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला असताना शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. पीकविमाच्या मागणीसाठी २३ डिसेंबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पंधरा दिवसात पीकविमापोटी संरक्षीत रक्कमेसह १३.८९ कोटी परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्या आश्वासनाची अद्यसापही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संतापाचा सूर उमटत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १३ जानेवारी रोजी सेनगाव येथील पीकविमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर १८ जानेवारीपासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. २० जानेवारी रोजी हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तर यांच्या ताफ्याला सेनगाव- रिसोड मार्गावर काळेझेंडे दाखविण्यात आले होते. तर २१ जानेवारी रोजी गोरेगाव- जिंतूर मार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकीने, वसमत तालुकाध्यक्ष बापुराव गरड, युवा तालुकाध्यक्ष ऋषिकेश बर्वे यांच्याकडून केल्या जात असलेल्या उपोषणाला जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या पाठिंबा मिळत आहे.
रविवारी बंदची हाक...
आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने रविवारी (दि.२१ जानेवारी) गोरेगावसह हिंगोली व सेनगाव येथील बाजारपेठ बंदची हाक दिली आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या बंदमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.