२२ बैल घेऊन जाणारा ट्रक पाठलाग करून पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 02:47 PM2024-02-18T14:47:31+5:302024-02-18T14:47:47+5:30
बैलांचा ट्रक येत असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना व बाळापूर येथील नागरिकांना तसेच वारंगाफाटा येथील नागरिकांना देखील देण्यात आली.
हिंगोली: तब्बल २२ बैलांना ट्रकमध्ये कोंबून हिंगोलीकडून नांदेड जिल्ह्याच्या दिशेने जाणारा ट्रक नागरिकांनी व पोलिसांनी पाठलाग करून वारंगा फाटा येथे पकडला. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
१८ फेब्रुवारी रोजी हिंगोलीकडून नांदेडकडे एक ट्रक (क्र. एमएच ३५ के ५२९७) तब्बल २२ बैलांना कोंबून जात असल्याची माहिती कळमनुरी येथील नागरिकांना कळाली. त्यानुसार कळमनुरीहून त्या ट्रकचा पाठलाग नागरीक करत करत होते.
बैलांचा ट्रक येत असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना व बाळापूर येथील नागरिकांना तसेच वारंगाफाटा येथील नागरिकांना देखील देण्यात आली. सदरील ट्रक जरोडा येथील टोलनाक्यावर आडविण्याचा प्रयत्न केला. परंतु टोल नाक्यावरील वाहन अडविण्यासाठी असणारा पाईप तोडून भरधाव वेगाने तेथून तो प्रसार झाला. तो बाळापूरमध्येही आडविला गेला नाही. तेथून नागरिक व पोलिस वारंगा फाटाकडे त्या ट्रकचा पाठलाग करत आले.
वारंगा फाटा येथे नागरिकांना अगोदरच ही माहिती समजली. त्यामुळे नागरिकांनी वारंगा फाटा येथे महामार्गावर पहाटे सहा वाजेच्या सुमारास काही वाहने आडवी उभी करून तो ट्रक आडविला. त्यामध्ये एकूण २२ बैल कोंबल्याचे आढळून आले. बैलांसह ट्रक आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये नेण्यात आली असल्याची माहिती फौजदार शिवाजी बोंडले यांनी दिली. त्या ट्रक चालकास नागरिकांनी जबर चोप दिल्याचे सांगितले.