वारंगा फाटा येथे पुन्हा ३० जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 03:51 PM2024-02-22T15:51:45+5:302024-02-22T15:52:04+5:30
सदर ट्रक बैल घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती.
हिंगोली: चार दिवसाखालीच २२ बैल कत्तलीसाठी घेऊन जाणारा ट्रक पोलिस व गोरक्षकांनी पकडल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा ३० बैल घेऊन जाणारा ट्रक गोरक्षक व पोलिसांनी कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे पकडला.
१८ फेब्रुवारी रोजी गोरक्षक व पोलिसांनी वारंगा फाटा येथे नागपूरहून २२ बैलांना ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असताना एक ट्रक व तिघांना ताब्यात घेतले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा नागपूर येथूनच निजामाबाद येथे कत्तलीसाठी ३० बैलांना घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच ३१ सीबी ७९८७) गोरक्षक व पोलिसांनी वारंगा फाटा येथे पकडला.
सदर ट्रक बैल घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कनेरगाव नाका येथून सदरील ट्रकचा पाठलाग केला. ट्रक येत असल्याची माहिती पोलिसांनाही सदर गोरक्षकांनी दिली होती. ट्रकचा पाठलाग केला जात असल्याचे समजताच ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक पळून साळवा-जरोडा दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर टोल तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर वारंगा फाटा येथे त्या ट्रकचे टायर रनिंगमध्ये असतानाच गोरक्षकांनी पंक्चर करून ट्रक थांबविला.
गोरक्षकांनी तिघांना दिला चोप...
ट्रक पकडणाऱ्या गोरक्षकांनी ट्रकमधील विकास सेक्रीट डिसोजा (वय ३५, रा. नागपूर), शंकर निळकंठ कावडकर (वय ३२, रा. बिलगाव नागपूर), चालक मोहम्मद इर्शाद अन्सारी मोहम्मद आयुब अन्सारी (वय ३३, रा. यशोधरानगर नागपूर) या तिघा जणांना चोप दिला. या ठिकाणी उपस्थित असलेले पोलिस शिपाई प्रभाकर भोंग व होमगार्ड तसलीम प्यारेवाले यांनी त्यांच्या तावडीतून त्या तिघांची सुटका करून त्यांना बाळापूरच्या शासकीय दवाखान्यामध्ये दाखल केले. यावेळी ट्रकमधील बैलांची देखील सुखरूप सुटका करून त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गत चार दिवसांमध्ये वारंगा फाटा येथून कत्तलीसाठी जात असलेले ट्रक पकडल्याची घटना दुसऱ्यांदा घडली.