कर्जाची वर्षभर वसूली केली, पण १० लाखांची रक्कम खिशात घातली; मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 05:57 PM2024-07-13T17:57:32+5:302024-07-13T18:38:10+5:30
बचत गटांमधील महिलांना दिलेल्या कर्जाची वसूल केलेली रक्कम हडपल्याचे आले उघडकीस
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : आखाडा बाळापूर येथील देवीगल्ली भागात कार्यरत असलेले भारत फायनान्स कंपनीची शाखा आहे. येथील कार्यालयातील व्यवस्थापकानेच १० लाख ३७ हजार रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी ( दि.१२) रात्री अमोल अरुण मांजरमकर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथील देवीगल्ली भागात भारत फायनान्स कंपनीच्या शाखेचे कार्यालय आहे. बचत गटातील महिलांना या कंपनीकडून कर्ज दिले जाते व दर आठवड्याला त्याची वसूली केली जाते. सदर जमा झालेली रक्कम फायनान्सच्या शाखेत भरणे आवश्यक आहे . परंतु आखाडा बाळापूर शाखेतील संगम व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला अमोल अरुण मांजरमकर (रा. बळीरामपूर, नांदेड ) याने त्याच्याकडे वसूलीतून जमा झालेली रक्कम जमा न करता परस्पर हडप केल्याचे म्हटले आहे. त्याच्याकडे कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव , डोंगरकडा , कुपटी, सापळी, आखाडा बाळापूर , हिवरा आदी गावे होती. या गावात बचत गटांमधील महिलांना कर्ज दिल्यानंतर त्या कर्जाची आठवडी हप्त्यानुसार वसूली केली जात होती .
मात्र दिनांक ं2 फेब्रुवारी 2023 ते 7 मे 2024 या कालावधीत जमा झालेली रक्कम त्याने शाखेत भरणा करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी वापरली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्याची बदली झाल्यानंतर नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांनी सदर गावांमधून महिलांकडून आठवडी हप्ता मागितला असता सदर महिलांनी कर्जाची परतफेड केल्याचे सांगितले. यावरून शाखेने तपासणी केली असता 41 महिलांचे 10 लाख 37 हजार 300 रुपये एवढी रक्कम अमोल मांजरमकर यांने स्वतःकडे ठेवून महिलांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर पैशांचा अपहार केला. याप्रकरणी नांदेड शाखेचे अधिकारी दयानंद बोरकर यांनी दिनांक 12 जुलै रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून आरोपी अमोल अरुण मांजरमकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ठाणेदार विष्णुकांत गुट्टे पोलीस उपनिरीक्षक गोटके हे पुढील तपास करत आहेत.