खदानीच्या पाण्यात पोहण्यास उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 12:38 PM2022-05-14T12:38:00+5:302022-05-14T12:38:22+5:30
केसापूर लोहगाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेशर मशीन असून खोदकाम केल्याने या ठिकाणी मोठमोठ्या खदानी तयार झाल्या आहेत.
नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील केसापूर लोहगाव शिवारामधील खदानीतील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोली येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. शेख आबुजाहेद शेख युनुस ( १७, रा. पेन्शनपुरा हिंगोली) असे मृत युवकाचे नाव आहे. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरा मृतदेह बाहेर काढण्यास नागरिकांना यश आले आहे.
केसापूर लोहगाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेशर मशीन असून खोदकाम केल्याने या ठिकाणी मोठमोठ्या खदानी तयार झाल्या आहेत. सध्या या खदानीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा सुध्दा उपलब्ध आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने हिंगोली येथील काही युवक पोहण्यासाठी येथील खदानीत आले होते. हे युवक दोनशे फूट लांब व दीडशे फूट रुंद तसेच पंचवीस फूट खोल असलेल्या खदानीच्या पाण्यात पोहत असताना यातील शेख आबुजाहेद शेख युनुस अचानक बुडाला. सोबतच्या युवकांनी त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही.
युवकांनी लागलीच याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना दिली. घटनेची माहिती मिळताच नर्सी पोलीस ठाण्याचे पोउपनि अशोक कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनास्थळी हजारोच्या संख्येने नागरिक जमा झाले. युवकाचा मृतदेह खदानीतील कपारीमध्ये अडकल्याने काढण्यास अडचण येत होती. अखेर रात्री उशिरा सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेश शिंदे यांनी खदानीत उतरून कपारीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.