जादूटोणा, करणीच्या संशयातून अपहरण करून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 07:08 PM2019-12-13T19:08:08+5:302019-12-13T19:12:06+5:30
ग्रामस्थांच्या माहितीनंतर पोलिसांनी केली तत्काळ कारवाई
बासंबा (जि. हिंगोली) : तालुक्यातील पारडा येथील शंकर साधू आलझेंडे यांचे अपहरण करून आरोपींनी जादुटोना व करणीच्या संशयातून १२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० ते ११.३० वाजेच्या सुमारास त्यांचा खून केला. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना शुक्रवारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सविस्तर माहिती अशी की हिंगोली तालुक्यातील पारडा येथील शंकर साधु आलझेंडे (५५) यांचे १२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास आरोपी नागनाथ उर्फ विकास किरण गोविंदपुरे, संतोष किसनआप्पा तोरकड, बाळू उर्फ सिद्धेश्वर रामा तोरकड सर्व रा. पारडा यांनी अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी शंकर आलझेंडे यांना एका निर्जन ठिकाणी नेऊन अश्लिल भाषेत शिवीगाळ करत ‘तू करणी कवटाळ, भानामती, जादुटोणा करतोस या संशयावरून त्यांना जबर मारहाण केली. या जबर मारहाणीत शंकर आलझेंडे यांचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिसांना रात्रीच संपर्क साधून याबबात माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव शंकर आलझेंडे यांना जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी संतोष मारोती आलझेंडे यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा र.नं.२२८/१९ कलम ३०२, ३६४,५०४,५०६, ३४ भादंवि सहकलम ३(२)(५) अ.जा.ज.प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा आरोपींना अटक, एक फरार
प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरविली.पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून उपविभागीय पोलीस अधिकारी शहर आर.आर.वैजणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, सहा.फौजदार मगन पवार, पोना प्रवीण राठोड, पोहेकाँ संजय राठोड, कल्याणकर, पोशि काकडे आदींनी तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्यातील मुख्य आरोपी नागनाथ उर्फ विकास किरण गोविंदपुरे, संतोष किशनअप्पा तोरकडे दोघे रा.(पारडा) हे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना १३ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास शिताफीने ताब्यात घेतले. तसेच या गुन्ह्यात आरोपीने वापरलेला आॅटो जप्त करण्यात आला आहे. आॅटोचालक बाळू उर्फ सिद्धेश्वर रामा तोरकड फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर आर.आर.वैजणे हे करीत आहेत.