महिला पोलीस कर्मचाऱ्यावर अत्याचार करून गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 07:16 PM2019-09-17T19:16:31+5:302019-09-17T19:18:27+5:30
अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
हिंगोली : येथील पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून गर्भपात करणाऱ्या औंढा नागनाथ ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर व वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये १६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला औंढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी मुनीर इब्राहिम मुन्नीवाले याने लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर मागील चार वर्षांपासून ही महिला कर्मचारी ज्या-ज्या ठिकाणी कर्तव्यावर गेली, तेथे जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. पोलिस मुख्यालय, जवळा बाजार, औंढा येथे तिने काम केले आहे. त्यानंतर सदर महिला कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पीडित महिला कर्मचाऱ्याने सोमवारी रात्री उशिरा वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी औंढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी मुनीर इब्राहिम मुन्नीवालेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख पुढील तपास करीत आहेत.